कडवट शिवसैनिक दुसरं काहीही करेल पण बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाही: संजय राऊत

राज्यातील विरोधक केंद्रीय तपास यंत्रणांसाठी लाल गालिचे अंथरत आहेत. ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे. | Sanjay Raut Anil Parab

0

मुंबई: कडवट आणि खरा शिवसैनिक दुसरं काहीही करेल पण तो बाळासाहेब ठाकरे यांची खोटी शपथ कधीची घेणार नाही, असे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंत्री अनिल परब यांची पाठराखण केली. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) ताब्यात असणाऱ्या सचिन वाझे यांनी पत्र लिहून अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. (Shivsena MP Sanjay Raut on Sachin Waze accusations on Anil Parab)

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राज्य सरकारची बाजू मांडली. राज्यातील विरोधक केंद्रीय तपास यंत्रणांसाठी लाल गालिचे अंथरत आहेत. ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे. इतकं गलिच्छ राजकारण महाराष्ट्र काय देशाच्या इतिहासात घडलं नाही. मात्र, महाराष्ट्रातील सरकारला अशाप्रकारे कोंडीत पकडण्याचे विरोधकांचे डावपेच यशस्वी होणार नाहीत. ठाकरे सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात दबावाचं राजकारण यशस्वी होणार नाही. विरोधकांनी कितीही अडथळे निर्माण केले तरी आम्ही ते भेदून पुढे जाऊ. निडरपणे लढून सर्व संकटं परतावून लावू, असा विश्सासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

‘लक्षात ठेवा जेलमधल्या इतर व्यक्तीही पत्र लिहू शकतात’

विरोधक हे सरकारमधील मंत्र्यांचे चारित्र्यहनन करायचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी लॉकअपमधील आरोपींकडून काही गोष्टी वदवून घेतल्या जात आहेत. अनिल परब यांच्यावर आरोप करणारा पत्रलेखक सध्या एनआआयएच्या ताब्यात आहे. हा पत्रलेखक संत किंवा महात्मा आहे का, यावर भाजपनं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. मात्र, जेलमध्ये आणखी काही व्यक्ती आहेत. त्यादेखील पत्र लिहू शकतात, असा गर्भित इशारा संजय राऊत यांनी दिला.

अनिल परब काय म्हणाले होते?

“दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे नेते दोन तीन दिवसांपासून आरडा ओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. म्हणजे हे प्रकरण आधीपासून माहिती होतं. सचिन वाझे आज पत्र देणार होता त्यामुळे तिसरी विकेट काढणार असं भाजपला आधीच माहिती होतं. एक आरोप माझ्यावर, एक अनिल देशमुख आणि एक आरोप अजित पवारांच्या जवळचा माणूस म्हणून घोडावत यांचं नाव घेण्यात आलं आहे”, असं परब यांनी म्हटलंय.

त्याचबरोबर ‘माझ्यावर जे दोन आरोप केले आहेत, त्याचा माझा संबंध नाही. अशी चौकशी सुरु आहे हे मला माहिती नाही. महानगरपालिकेच्या कंत्राटदाराशी माझी ओळखही नाही. त्यामुळे मी आज कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे, असंही परब म्हणाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.