धक्कादायक; सोलापुरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पस्तीस हजारावर जाण्याची शक्यता
ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा अंदाज : २८ हजार बेड राखीव
सोलापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ॲक्टिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्या जवळपास २३ हजार इतकी होती. तिसऱ्या लाटेत ही संख्या पस्तीस हजाराच्या पुढे जाईल, अशी भीती प्रशासनाला असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात पाच दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा तयार ठेवला आहे. यासोबत २८ हजार बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या जवळपास ६० हजारांवर होती. तिसरा लाटेच्या पार्श्वभूमीवर सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दिवसभर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना संदर्भात बैठक झाली. या बैठकीत विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. राज्य शासनाने शनिवारपासून रात्री अकरानंतर संचारबंदी लागू केली आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. यासोबत लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्याही सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.
पंढरपूर आणि अक्कलकोटमध्ये प्रत्येकी ४२ आयसीयू बेड तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात प्रशासनाने निविदा काढल्याची माहिती आहे.