गर्भवतींसाठी विशेष कोविड कक्ष

गेल्या काही वर्षांपासून या आरोग्य केंद्रात फक्त दंतचिकित्सा व प्रसूती विभाग सुरू आहे.

0 4

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी

पालघर : करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या पालघर येथील आरोग्य पथक व प्रसूतीगृहात गर्भवती महिलांसाठी विशेष कोविड कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीपासून या केंद्राचे कोविड रुग्णालयात रूपांतर करण्यात आले  आहे.

सर जे. जी. रुग्णालयाच्या एमबीबीएस विद्यार्थ्यांना ग्रामीण भागाचा परिचय व्हावा तसेच ग्रामीण भागात उपचार करण्यासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने  ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र (रुरल हेल्थ ट्रेनिंग सेंटर) सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह दंतचिकित्सक व सहयोगी प्राध्यापक यांची नेमणूक करण्यात आली आहे. पालघर येथे ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून अद्ययावत सुविधा पुरवल्या जाण्यापूर्वी जे.जे. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर या आरोग्य पथकाच्या ठिकाणी येऊन विविध प्रकारचे औषधोपचार व शस्त्रक्रिया करीत असत.

गेल्या काही वर्षांपासून या आरोग्य केंद्रात फक्त दंतचिकित्सा व प्रसूती विभाग सुरू आहे. तसेच लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येतो.असे असताना या केंद्रात स्त्री रोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ तसेच बालरोगतज्ज्ञ या पदांची पदनिर्मिती व नेमणूकच नसल्याने गुंतागुंत असलेल्या प्रसूतीकरिता महिलांना खासगी रुग्णालयात पाठवण्यात येते. सन २०२० च्या वर्षभर या केंद्रामध्ये फक्त २३७ नॉर्मल प्रसूती झाल्या असून सुमारे १३० पेक्षा अधिक महिलांना इतर रुग्णालयात प्रगत उपचारांसाठी रिफर केले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

करोना पार्श्वभूमीवर पालघर परिसरातील गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी मनोर येथे हलविण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध ठेवण्यात आली असून एकंदर परिस्थितीचा विचार करून करोनाची दुसरी लाट संपल्यानंतर पुन्हा या ठिकाणी प्रसूतिगह सुरू करण्याचा विचार नसल्याचे  जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले. याउलट तिसऱ्या करोना लाटेत लहान मुले व गर्भवती स्त्रियांना आजाराची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने या केंद्रामध्ये गर्भवती महिलांसाठी विशेष कक्ष उभारण्यात येईल, असे पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.

महिलांसाठी रुग्णालय उभारण्याची मागणी

पालघर शहराचा अवतीभवती पन्नास ते साठ हजार लोकवस्ती असताना महिन्याला जेमतेम पंधरा ते वीस प्रसूती करणाऱ्या या शासकीय प्रसूतीगृहाच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न निर्माण होत आहेत.  विशेष म्हणजे या प्रसूती केंद्रात स्त्री रोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने जिल्हास्तरीय विशेष महिला रुग्णालय उभारण्याची मागणी पुढे येत आहे. सध्या पालघरमधील काही खासगी प्रसूती केंद्रांकडून नागरिकांची पिळवणूक होत असून शासकीय रुग्णालयातून गुंतागुंतीच्या प्रसूती दरम्यान मोठय़ा प्रमाण शुल्क आकारणी होत असल्याचे नागरिकांकडून आरोप होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.