दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे?

राज्य सरकारचा प्रस्ताव

0 32

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून महिना उलटला तरीही अद्याप मूल्यमापन कसे होणार याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही. मात्र विद्यार्थ्यांचे मागील काही वर्षांतील गुण आणि यंदा शाळांनी केलेले अंतर्गत मूल्यमापन या आधारे निकाल जाहीर करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केल्याचे समजते.

बारावीच्या परीक्षांबाबत केंद्रीय स्तरावर निर्णय झाल्यानंतर राज्याचा निर्णय होणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा प्रश्न सुटलेला नाही. परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, न्यायालयाने शासनाला नियोजन सादर करण्यास सांगितले आहे. दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावरून माघार घेणार नसल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी सर्व विषयांची एकत्रित परीक्षा घेण्यापासून ते ऑनलाइन परीक्षेपर्यंतच्या विविध पर्यायांची चाचपणी केल्यानंतर विद्यार्थ्यांचे निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याचा प्रस्ताव विभागाने शासनाकडे दिल्याचे समजते आहे. दहावीच्या निकालाबाबत चाचपणी करताना आणि एकूण वर्षभराचा शैक्षणिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी शिक्षण विभागानेच काही दिवसांपूर्वी अंतर्गत मूल्यमापनाबाबत माहिती संकलित केली होती. ८३ टक्के शाळांनी अंतर्गत मूल्यमापनाच्या बाजूने कौल दिला होता.

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत मुख्यमंत्री, महाधिवक्ता, तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून त्यानंतर अंतिम आराखडा जाहीर करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सर्वाधिक शाळांकडून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे चाचणी

राज्यात एकूण २५ हजार ४९८ शाळा आहेत. त्यातील साधारण १७ हजार शाळांच्या मुख्याध्यापकांनी अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यास होकार दिला होता. मात्र विभागाने त्यापूर्वी मागवलेल्या माहितीनुसार जेमतेम ५० टक्केच शाळांनी विभागाला अंतर्गत मूल्यमापनाची माहिती दिली होती. अंतर्गत मूल्यमापनासाठी ऑनलाइन चाचणी, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून चाचणी, ऑनलाइन सत्र, प्रत्यक्ष लेखी परीक्षा, विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन परीक्षा, प्रकल्प आदी पर्याय शाळांसमोर ठेवून माहिती संकलित करण्यात आली. त्यानुसार सर्वाधिक शाळांनी व्हॉट्सअ‍ॅपवरील चाचणीच्या माध्यमातून मूल्यमापन केल्याचे नोंदवले होते.

मूल्यमापन कसे?

’दहावीच्या अंतिम परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी शाळांनी वर्षभरात वेगवेगळ्या माध्यमांतून केलेले मूल्यमापन ग्राह्य़ धरण्यात येईल.

’मागील काही वर्षांचे म्हणजेच आठवी, नववीच्या मूल्यांकनाचाही विचार दहावीतील मूल्यमापनासाठी केला जाऊ शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.