हक्काचे आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही

आरक्षणाच्या हक्कासाठी भारतीय जनता पक्ष ओबीसी आघाडीच्यावतीने संविधान चौकात गुरुवारी आक्रोश आंदोलन करण्यात आले.

0 19

भाजप ओबीसी आघाडीचे आंदोलन

नागपूर : आरक्षणाच्या हक्कासाठी भारतीय जनता पक्ष ओबीसी आघाडीच्यावतीने संविधान चौकात गुरुवारी आक्रोश आंदोलन करण्यात आले. ओबीसी समाजाला हक्काचे आरक्षण मिळणार नाही, तोवर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा देऊन ओबीसी आघाडीच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. यावेळी अनेक कार्यकर्ते मुखपट्टी न लावता सामाजिक अंतराचे पालन न करता नियमांचा फज्जा उडवला.

ओबीसी समाजाचे नेते आमदार शहर अध्यक्ष प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडम्े व आघाडीचे अध्यक्ष रमेश चोपडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यातिथीनिमित्त प्रारंभी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

यावेळी रमेश चोपडे म्हणाले, महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत केलेल्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत, जिल्हापरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना मिळणाऱ्या अतिरिक्त राजकीय आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत सध्या सारखीच स्थिती आहे. महाविकास आघाडीचे हे अपयश आहे.

गेल्या पंधरा महिन्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाच ते सात वेळा पत्राद्वारे आघाडी सरकारला उच्च न्यायालयाच्या आदेशाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने अनेकवेळा पत्र दिले. पण मुख्यमंत्र्याकडून एकाही पत्रावर उत्तर आले नाही किंवा त्यावर कोणतीही कारवाई देखील करण्यात आली नाही. त्यामुळे लवकरात लवकर यावर ठोस कारवाई करा! तसे झाले नाही तर ओबीसी समाजाला आंदोलन शिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाला दिलेले हक्काचे आरक्षण आम्ही मिळवूनच राहू असा इशारा ओबीसी नेत्यांनी यावेळी दिला.

या संदर्भात नागपूर ओबीसी आघाडीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून जिल्हाधिकाऱ्यांना ते देण्यात आले. यावेळी प्रकाश टेकाडे, घनश्याम खवले, नरेश बरडे, शंकरराव चौधरी, दशरथ मस्के, विनोद बांगडे, कमलेश चकोले, रामभाऊ  आंबुलकर, उपमहापौर मनीषा धावडे, अविनाश ठाकरे, रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.