नव्या जिल्हा रुग्णालयाला बळ

पालघर जिल्ह्यतील रुग्णांची होणारी परवड थांबवण्याच्या दृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

0 3

पालघर : पालघर जिल्ह्यतील रुग्णांची होणारी परवड थांबवण्याच्या दृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ३५५ पदांना आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे. विक्रमगड येथील अधिग्रहित रिवेरा रुग्णालयात हंगामी जिल्हा सामान्य रुग्णालय स्थापन करण्याचा मार्ग खुला झाला आहे.

सिडकोतर्फे उभारण्यात येणाऱ्या जिल्हा कार्यालयासोबत जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी दहा एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. या जागेला कुंपण घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. इमारतीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी तांत्रिक मान्यता व इतर काही बाबींची पूर्तता होणे प्रलंबित आहे. राज्यातील आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, ट्रामा केंद्र इत्यादी आरोग्य संस्थांच्या इमारतीचे ७५ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. अशा ठिकाणी पदांचा आकृतीबंद निश्चित करण्याचे आदेश आरोग्य विभागाने काढले आहेत.

पालघर येथे २० मे २०१६ रोजी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयासाठी १२ पदे मंजूर करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष जागेची उपलब्धता नसल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय कार्यरत झाले नव्हते. नवीन जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीसाठी किमान दोन ते अडीच वर्षांचा कार्यकाळ लागणे अपेक्षित आहे.

करोना पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विक्रमगड जवळील हातणे येथील ३०० खाटांचे रिवेरा रुग्णालय अधिग्रहित केले आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वनारे यांनी रिवेरा रुग्णालय, इतर इमारती व मोकळी जागा पाच वर्षांसाठी विनामूल्य अधिग्रहित केली होती. या पार्श्वभूमीवर विशेष बाब म्हणून पालघर जिल्ह्यसाठी ३५५ आरोग्य कर्मचाऱ्यांची पदांना मंजुरी दिली आहे.

२०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या अनुषंगाने १२४ नियमित पदे व २३१ मनुष्यबळ बा यंत्रणेद्वारे घेण्यासाठी अनुमती देण्यात आली आहे. या पदांमध्ये अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, स्त्रीरोग, बालरोग, शस्त्रक्रिया, अस्थिरोग, क्षयरोग, कान-नाक-घसा वैद्यकीय अधिकारी, चर्म रोग, नेत्रचिकित्सक, दंतचिकित्सक, बधिरीकरण शास्त्रज्ञ अशी विविध वैद्यकीय अधिकारी, क्ष—किरण शास्त्रज्ञ, शरीर विकृती चिकित्सक, मनोविकृत विषय चिकित्सक, सेविका व वैद्यकीय कर्मचारी यांच्या पदाला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबरीने अतिदक्षता, नवजात बालकांचा अतिदक्षता , शुश्रूषा, रुग्ण प्रशिक्षण , शुश्रूषा प्रशिक्षण, मनोविकृती चिकित्सा विभागासह, अपंग पुनर्वसन केंद्र, सिटी स्कॅन विभाग, ट्रॉमा केअर युनिट या पदांसाठी विविध पदांना मंजुरी देण्यात आली आहे. याचबरोबरीने जिल्ह्यतील तीन कार्यालय सांकेतिक पदांसाठी देखील पदनिर्मिती करण्यात आली आहे.

या पदांच्या भरतीबाबत राज्य शासनाने निर्णय घेतल्यानंतर विक्रमगड येथे जिल्हा सामान्य रुग्णालय कार्यरत होण्याचा मार्ग सुकर होणार आहे. पालघर सामान्य रुग्णालयाची इमारत किंवा मनोर येथील २०० खाटांचे ट्रॉमा काळजी केंद्र इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर या रुग्णालयाचे स्थलांतर शासकीय वास्तूंमध्ये करणे शक्य होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.