Washim Lockdown Latest Update: लॉकडाऊनमधून शेतकऱ्यांना दिलासा; ‘या’ जिल्ह्यात नवा आदेश जारी

Washim Lockdown Latest Update: वाशिम जिल्ह्यात करोनाची साखळी तोडण्यासाठी सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले असून खरिप हंगाम लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी काही प्रमाणात मुभा देणारा आदेश काढला आहे.

0 46

हायलाइट्स:

  • वाशिम जिल्ह्यातील कडक निर्बंधांत अंशत: बदल.
  • कृषी सेवा केंद्र सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत सुरू राहणार.
  • जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी जारी केला आदेश.

वाशिम : करोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण वाशिम जिल्ह्यात काही सवलतींसह २७ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या आदेशात अंशतः बदल करून जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी गुरुवारी निर्गमित केले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, खरिप हंगामासाठी शेतकऱ्यांना खते, बियाणे खरेदी करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा राहणार आहे. जिल्ह्यात किराणा सामानाची सर्व दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, पिठाची गिरणी व रेशन दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, पिठाची गिरणी व रेशन दुकाने यांना ग्राहकांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध करून देण्यास मुभा राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. २७ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत हे आदेश जिल्ह्यात लागू राहणार आहेत.

दरम्यान, राज्यात १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू आहे. त्या आदेशाला अनुसरूनच जिल्ह्यात अधिक निर्बंध लादण्यात आले आहेत. २७ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंतसाठी हे आदेश असल्याने त्यापुढे जिल्ह्यात काही अधिक सवलती मिळणार का, हे तेव्हाच स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यातील करोना संसर्गाची तेव्हाची स्थिती लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.