बुलढाणा : जिल्ह्यात दहा दिवस राहणार कठोर निर्बंध

घरपोहोच सेवा, ग्राहकांसाठी दुकाने बंद

0 25

–घरपोहोच सेवा, ग्राहकांसाठी दुकाने बंद–

-सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, मिठाई, बेकरी, पिठाची गिरणी यासह खाद्य पदार्थांची दुकाने बंद राहणार आहेत.

पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्यांशी निगडित दुकाने, गॅस एजन्सी बंद राहील. मात्र, घरपोहोच सिलिंडरचे वाटप सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधीत करता येईल.

–दूध संकलन, वितरणासाठी सवलत–

शिवभोजन थाळी, खानावळ, रेस्टॉरंट, हॉटेल यांना घरपोहोच पार्सल सेवा सकाळी १० ते सकाळी ११ आणि रात्री ७ ते रात्री ८ या कालावधीत देता येईल.

दूध संकलन केंद्र व घरपोहोच दूध वितरण व्यवस्था सकाळी ६ ते सकाळी ९ आणि सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहील.

–ही प्रतिष्ठाने राहणार बंद अन् सुरू–

बाजार समित्या आणि भाजी मार्केट, आठवडी बाजार बंद राहतील. त्यासंदर्भातील जबाबदारी ही जिल्हा उपनिबंधक, तहसीलदार आणि पालिका मुख्याधिकारी यांची राहील.

-सार्वजनिक, खासगी क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने बंद राहतील.

-केशकर्तनालय, स्पा, ब्युटी पार्लर, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद राहणार आहेत. परंतु, ऑनलाईन शिक्षण सुरू राहील.

– लग्न समारंभ, स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल बंद राहणार आहेत. लग्न घरगुती स्वरूपात २५ व्यक्तींच्या उपस्थितीत दोन तासांत पार पाडावे लागणार आहे.

-चष्म्याची दुकाने बंद राहतील. मात्र, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णास डोळ्यांच्या डॉक्टरांवर त्यांच्या दवाखान्याला जोडण्यात आलेल्या चष्मा दुकानात चष्मा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राहील.

-नागरी भागातील पेट्रोल पंप बंद राहतील. परंतु, रुग्णवाहिका, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्या वाहनांकरिता पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कंपनीचे अधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची आहे.

-सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये व आस्थापना, वित्त व्यवसायाशी निगडित सर्व कार्यालयांना ऑनलाईन काम करता येईल.

– केवळ अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना यांच्याशी संबंधित शासकीय, निमशासकीय कार्यालये सुरू राहतील. यात आरोग्य सेवा, महसूल विभाग, पोलीस विभाग, ग्रामपंचायत, नगरपालिकांचा समावेश राहील.

-सर्व बँका, पतसंस्था, पोस्ट ऑफिस नागरिकांसाठी बंद राहतील. मात्र, कार्यालयीन वेळेत प्रशासकीय कामासाठी सुरू राहतील.

-आपले सरकार सेवा केंद्र व सेतू केंद्रे नागरिकांसाठी बंद राहतील. नागरिकांना घरून ऑनलाईन स्वरूपात प्रमाणपत्र व सुविधांकरिता अर्ज सादर करता येईल. दस्त नोेंदणीचे काम बंद राहील.

-सार्वजनिक तसेच खासगी बस वाहतूत, रिक्षा, चारचाकी, दुचाकी वाहने यांची वाहतूक पूर्णपणे बंद राहील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना अेाळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील.

-कालावधी–

१० मे च्या रात्री ८ वाजेपासून ते २० मे च्या पहाटे ६ वाजेपर्यंत

–या प्रतिष्ठानांना राहणार सवलत

-खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा, मेडिकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाईन, औषध सेवा २४ तास सुरू राहील.

-अत्यावशक सेवा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना यांच्याशी संबंधित शासकीय, निमशासकीय कार्यालये, एमआयडीसी, उद्योग, कारखाने, सूतगिरणी येथे केवळ कंपनीच्या परिसरात राहणाऱ्या कामगार व कर्मचारी यांना परवानगी राहील.

-शासकीय यंत्रणेमार्फत मान्सूनपू‌र्व विकासकामे, आवश्यक पाणीपुरवठा व टंचाईविषयक कामे चालू राहतील. या काळात विविध यंत्रणांना वेगवेगळ्या परवानगीची आवश्यकता राहणार नाही.

-घरपोहोच सेवा पुरविणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी आवश्यक, तसेच संबंधित दुकानाचे अेाळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहणार आहे.

—वृत्तपत्रांचे वितरण राहणार सुरळीत–

या कठोर निर्बंधांच्या कालावधीत जिल्ह्यात वृत्तपत्रांचे वितरण सुरळीत सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. वृत्तपत्रे ही माहिती मिळविण्याचे खात्रीशीर व विश्वासार्ह माध्यम असल्याने वृत्तपत्रांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे. वृत्तपत्र घरोघरी पोहोचविणाऱ्या विक्रेत्या बांधवांना कसलीही आडकाठी होणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात १० मे च्या रात्री ८ वाजल्यापासून २० मे च्या पहाटे ६ वाजेपर्यंत जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. दहा दिवसांच्या कडक निर्बंधांच्या कालावधीत वैद्यकीय सेवा, मेडिकल, दवाखाने व दुधाचे वितरण वगळता इतर दुकाने व आस्थापना, शासकीय कार्यालये सुरू राहणार नाहीत. वृत्तपत्राचे वितरण सुरू राहणार आहे.

(एस. रामामूर्ती, जिल्हाधिकारी, बुलडाणा)

Leave A Reply

Your email address will not be published.