आपले गुरुजी अभियानांतर्गत वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्यास प्रहार शिक्षक संघटनेचा तीव्र विरोध
शेगांव :
राज्य शासनाने सर्व शिक्षकांनी आपापल्या वर्गामध्ये स्वतःचे ए-फोर साईजचे रंगीत छायाचित्र ( फोटो ) लावण्याचे आदेश दिले आहेत. दोन आठवड्यामध्ये वर्गशिक्षकांचे फोटो वर्गात लावण्याचे शाळांना एका परिपत्रकाद्वारे कळविण्यात आलेले आहे. वर्गात शिक्षकांचा फोटो लावणे म्हणजे शिक्षकांच्यावर अविश्वास दाखवल्यासारखे असून शासनाच्या या निर्णयाचा निषेध करत शिक्षकांनी वर्गात फोटो लावू नयेत असे आवाहन करत सदरचा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
वर्गात शिक्षकांचे फोटो लावणे हा शिक्षण विभागाचा निर्णय उचित नाही,विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गुरुजी विषयी आदर निर्माण करण्यासाठी गुरूजीचा फोटो वर्गात लावण्याची आवश्यकता नाही,आयुष्यभर विद्यार्थी आपले गुरूजी विसरू शकत नाहीत हा अनुभव आपल्या शालेय जीवनातला सर्वाना आलेला आहे.
आपले गुरूजी सन्मान अभियानांतर्गत वर्गात फोटो लावण्याच्या शासन निर्णयापेक्षा विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्यासंदर्भातील शासनाच्यावतीने शासन निर्णय काढण्यात यावेत.
– महेंद्र रोठे,जिल्हाध्यक्ष
प्रहार शिक्षक संघटना, बुलडाणा