वैद्यकीय प्राणवायू पुरवठय़ासाठी महानिर्मितीची धडपड!

0 6

परळी, कोराडी, खापरखेडा, पारसमध्ये रिफिलिंग प्रकल्पासाठी प्रयत्न

नागपूर : राज्यात करोनाचा उद्रेक वाढल्यावर सर्वत्र प्राणवायू टंचाई जाणवत असल्याने  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी  राज्यातील परळी, कोराडी, खापरखेडा, पारस या प्रकल्पांमध्ये प्राणवायू रिफिलिंग प्रकल्पाला तातडीने कार्यान्वित करण्यासाठी धडपड सुरू केली आहे.

महानिर्मितीच्या काही वीज केंद्रातील ओझोन प्रकल्पातून परिसरातील रुग्णालयांना प्राणवायू पुरवठा तातडीने करण्यासाठी महानिर्मितीने कंबर कसली आहे. औष्णिक वीज केंद्रात वापरल्या जाणाऱ्या पाण्यात शेवाळ-सूक्ष्मजंतू होऊ  नयेत यासाठी त्या पाण्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी ओझोनायझेशन प्रकल्पातून स्थापित केलेले असतात. वीजनिर्मितीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन अशा प्रकल्पातून  काही अतिरिक्त यंत्रणा उभारून किमान ९५ टक्के शुद्धता राखून पूरक  वैद्यकीय प्राणवायू निर्मिती होऊ  शकते. पहिल्या टप्प्यात महानिर्मितीच्या नवीन परळी केंद्राने काही दिवसांत अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाला प्रतिदिन २८८ जम्बो सिलेंडर क्षमतेचा  व ९५.२ टक्के शुद्धतेचा प्राणवायू प्रकल्पातून उभारला. हा प्रकल्प २७ एप्रिल रोजी कार्यान्वित झाल्याने परळी-बीड परिसरातील  रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे.  आता प्रतितास ८४ घनमीटर क्षमतेचा अशाच प्रकारचा प्रकल्प परभणी जिल्हा परिषद कोविड रुग्णालय येथेही उभारला जात असून तो पुढच्या आठवडय़ात कार्यान्वित होईल. दुसऱ्या टप्प्यात  खापरखेडा व पारस वीज केंद्रातील सद्यस्थितीतील ओझोनायझेशन प्रकल्पातून नजीकच्या शासकीय रुग्णालय परिसरात स्थलांतरित करून तिथून प्राणवायू  निर्मिती साध्य केली जाणार आहे. खापरखेडा वीज केंद्रातही प्रतितास ४२ घनमीटर या क्षमतेने आणि पारस वीज केंद्राद्वारे प्रति तास ५० घनमीटर या क्षमतेने प्राणवायू पुरवठा साध्य केला जाईल. दरम्यान कोराडी (नागपूर), पारस (अकोला) व परळी (बीड) येथे वीज केंद्र परिसरातच रिफिलिंग/बॉटलिंग प्रकल्पातून उभारून प्राणवायू सिलेंडर निर्मिती साध्य करणे हा नियोजनाचा तिसरा टप्पा असणार आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त आवश्यक ते कॉम्प्रेसर्स, फिल्टर्स व इतर अत्यावश्यक यंत्रसामुग्री तातडीने विदेशातून आयात/देशांतर्गत उपलब्ध केली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.