“मी स्वत: डोंबिवलीत येऊन…”; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना इशारा
“महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील पोलीस दल अत्यंत दबावाखाली आहे,” असंही फडणवीस म्हणालेत.
“भाजपा सरकार असताना महाराष्ट्राचं पोलीस दल कधीही राजकीय दबावाखाली नव्हते. मात्र महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील पोलीस दल अत्यंत दबावाखाली आहे. अशा प्रकारचा राजकीय दबाव महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारा आहे,” अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी डोंबिवलीमध्ये बोलताना केली.
“डोंबिवलीतील भाजपा कार्यकर्ते मनोज कटके यांच्यावर हल्ला होऊन चार दिवस उलटले तरी पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही ही शोकाची आणि गंभीर बाब आहे. आरोपीला लवकर अटक झाली नाही तर मी स्वतः डोंबिवलीत येऊन मोर्चा काढीन, पोलीस ठाण्याला घेराव घालीन,” असा इशारा फडणवीस यांनी दिला. तसेच, “हा विषय विधानसभेत मांडू,” असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.