थंडीमुळे चिंतेत वाढ
सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांत वाढ; करोनाबाधित, सामान्य रुग्ण यांत फरक करणे कठीण
ठाणे/बदलापूर : दोन दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस आणि त्यापाठोपाठ आलेली थंडीची लाट यांमुळे सध्याच्या ‘करोनाभीती’त भर पाडली आहे. ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांचे किमान तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत घसरले आहे. अचानक झालेल्या हवामानबदलामुळे सर्दी, तापाचे रुग्ण वाढले आहेत. मात्र करोनामध्येही हीच लक्षणे आढळत असल्याने करोना आणि सामान्य आजार यांच्यात फरक करणे कठीण झाले आहेत. त्यातच अनेक रुग्ण लक्षणे असल्यास चाचणी न करताच खासगी डॉक्टरांकडून उपचार घेत असल्याचे आढळून येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून घसरलेल्या या पाऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात थंडी आणि अवकाळी पावसानंतर सर्दी, खोकला, ताप, अंगदुखीच्या रूग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक रुग्ण कौटुंबिक डॉक्टर किंवा खासगी दवाखान्यांत जाऊन यावर औषधोपचार घेऊ लागले आहेत. मात्र त्यामध्ये करोनाची लागण झालेले रुग्ण असण्याचा धोकाही वाढला आहे. दुसरीकडे, अशी लक्षणे दिसू लागताच आपल्यालाही करोनाची बाधा झाली, या भीतीने सामान्य तापाचे रुग्णही धास्तावू लागले आहेत.