ठाणेकरांना अंशत: दिलासा; पालिकेकडून १५ जूनपर्यंत हे नवे आदेश जाहीर

ठाणे शहरातील करोना बाधित होण्याचा दर १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने शहरातील निर्बंध अंशत: शिथिल करण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारी घेतला.

0 0

ठाणे : ठाणे शहरातील करोना बाधित होण्याचा दर १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने शहरातील निर्बंध अंशत: शिथिल करण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारी घेतला. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे शहरामध्ये आवश्यक वस्तू व सेवांच्या दुकानांची वेळ सकाळी ७ ते दुपारी २ अशी करण्यात आली आहे. आवश्यक गटात नसलेली मॉल व शॉपिंग सेंटरव्यतिरिक्त सर्व एकल दुकानेही सुरू आठवड्यातील पाच दिवस दुपारी दोनपर्यंत खुली करण्यास मुभा देण्यात आली आहे. तर ई-कॉमर्स कंपन्यांना आवश्यक वस्तूंच्या बरोबरीने अन्य वस्तूंच्या वितरणालाही परवानगी देण्यात आली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात ‘ब्रेक द चेन’अंतर्गंत लागू करण्यात आलेल्या कठोर लॉकडाऊनमधून शहरातील सेवा सुविधांना सूट देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडून निर्देश देण्यात आले आहेत. १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठाणे महापालिकेस शासनाकडून करोना संसर्ग रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून घोषित केले आहे.

ठाणे शहरातील करोनाचा विळखा सैल झाला असला तरी तिसऱ्या लाटेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे यापूर्वी लागू करण्यात आलेले कठोर निर्बंध कायम असले तरी पॉझिटिव्हीटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने काही सेवा सुविधांना शिथिलता देण्यात आली आहे. शहरातील सर्व प्रकारच्या वस्तू व सेवांच्या दुकानांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे. आवश्यक गटात नसल्याने बंद असलेली एकल दुकानेही यामुळे उघडता येणार आहेत. तर दुपारी दोननंतर वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगाव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध कायम असणार आहेत. होम डिलिव्हरीसाठी परवानगी कायम आहेत.

करोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होणार आहेत. उपस्थिती वाढवायची असल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने वाढवण्यात येईल. कृषीविषयक

दुकाने मात्र आठवड्याच्या सर्व सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सेवेसाठी खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुकानांना पुरवठा करणाऱ्या वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध असणार नाहीत. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर विक्री करता येणार नाही. या नियमाचा भंग केल्यास करोनाची साथ संपेपर्यंत दुकान बंद ठेवण्यात येईल, तसेच दंडात्मक कारवाईही करण्यात येणार आहे.

मॉल आणि शॉपिंग सेंटर प्रतीक्षेत

ठाणे शहरात सर्व वस्तू आणि सेवा पुरवणाऱ्या दुकानांना सात तास खुली ठेवण्यात येणार असली तरी मॉल आणि शॉपिंग सेंटरना मात्र परवानगी मिळालेली नाही. ठाणे महापालिका क्षेत्रातील मॉल सुरू करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मॉल संघटनांकडून आय़ुक्तांना पत्र व्यवहार करण्यात आला आहे. परंतु राज्य शासनाकडून मॉलसंदर्भात निर्देश नसल्याने १५जून पर्यंत वाट पहावी लागणार आहे.

इतर महापालिकांमध्ये संभ्रम

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री स्थानिक प्रशासनाला लॉकडाउन संदर्भातील निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांना निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. तर मिराभाईंदर, उल्हासनगर, भिवंडी या महापालिका आणि अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकांसह ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश देणे अपेक्षित होते. परंतु सायंकाळपर्यंत या संदर्भातील कोणतेही निर्देश न दिल्याने या भागातील दुकानदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. रात्री उशिरा या संदर्भात आदेश काढण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आले. परंतु कार्यालये बंद झाल्यानंतर आदेश येत असल्याने अनेकांकडून नाराजी व्यक्त होत होती.

Leave A Reply

Your email address will not be published.