Maharashtra Unlock Confusion : अनलॉकबाबत अंतिम मसुदा मुख्यमंत्र्यांकडे दिलाय, मंजुरीनंतर दुपारपर्यंत अधिसूचना निघेल : विजय वडेट्टीवार

राज्यातील अनलॉकच्या गोंधळानंतर मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. अनलॉकबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव दिला आहे, दुपारपर्यंत अधिसूचना निघेल, असं त्यांनी सांगितलं. विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील अनलॉकबाबत केलेल्या घोषणा त्यानंतर राज्य सरकारने दिलेलं स्पष्टीकरण आणि त्यानंतर वडेट्टीवार यांनी घेतलेला यू टर्न यामुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे.

0 14

मुंबई : “अनलॉकसंदर्भात अंतिम मसुदा तयार करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे, त्यांची मंजुरी मिळाली की दुपारपर्यंत अधिसूचना निघेल. जिल्ह्यातील परिस्थितीनुसार नियमावली लागू होईल,” अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली. नागपूरमध्ये पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यामुळे या नियमावलीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील अनलॉकबाबत केलेल्या घोषणा त्यानंतर राज्य सरकारने दिलेलं स्पष्टीकरण आणि त्यानंतर वडेट्टीवार यांनी घेतलेला यू टर्न यामुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे.

विजय वडेट्टीवार यांची घोषणा आणि राज्य सरकारचं स्पष्टीकरण
राज्य सरकारने लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले असल्याचं विजय वडेट्टीवार गुरुवारी झालेल्या  पत्रकार परिषदेत सांगितलं. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरु होतील, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली होती. मात्र त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर सरकारच्या माहिती विभागाकडून एक प्रेसनोट जारी करण्यात आली. यामध्ये राज्यातील निर्बंध हटवलेले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन असल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आहे. यानंतर विजय वडेट्टीवार यांनी यू टर्न घेतला आहे. “अनलॉकच्या निर्णयात कोणतीही गफलत नाही, 5 टप्प्यात अनलॉकच्या निर्णयाला तत्वत: मान्यता देण्यात आली असून अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील,” असं त्यांनी सांगितलं.

श्रेयवादाचा विषय नाही, फडणवीसांच्या टीकेवर वडेट्टीवार यांचं उत्तर 
सरकारमध्येच सुरु असलेल्या गोंधळावर विरोधकांनीही तोंडसुख घेतलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत काही खोचक प्रश्न विचारले. काय सुरु, काय बंद? कुठे आणि केव्हापर्यंत? लॉक की अनलॉक? पत्रपरिषद की प्रेसरिलीज? अपरिपक्वता की श्रेयवाद? असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, “विरोधक म्हणून त्यांची अशी भूमिका मांडावीच लागेल. पण यामध्ये श्रेयवादाचा विषय नाही. सरकार म्हणून जे काही करायचं आहे ते आम्ही करुच.”

विजय वडेट्टीवारांनी पत्रकार परिषदेत काय सांगितलं होतं? 
विजय वडेट्टीवार यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, “राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरु होतील. पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे आहेत. पहिल्या टप्प्यात ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली,  चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आता निर्बंध हटवण्यात आले आहेत. या जिल्ह्यातून लॉकडाऊन मागे घेण्यात आला आहेत. या नियमांची अंमलबजावणी 4 जूनपासून होणार आहे. ही अंमलबजावणी त्या जिल्ह्यातील ते जिल्हाधिकारी करतील. दर शुक्रवारी आढावा घेतला जाईल, असंही वडेट्टीवार म्हणाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.