ताडोब्यात बिबट्यांची वाढ,वाघांची संख्या स्थिरावली; २०२१ च्या प्रगणना अहवालातील माहिती

0

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वन्यजीव संवर्धन आणि सुरक्षेचा परिणाम दिसून आला आहे. प्रगणनेदरम्यान २०२१मध्ये प्रकल्पात ११८ बिबटे, तर ८६ वाघ दिसून आले. वाघांची संख्या स्थिरावली असली, तरी बिबट्यांची संख्या अधिक गतीने वाढल्याचे दिसून येत आहे.

भारतीय वन्यजीव संस्थेद्वारा तांत्रिक सहकार्याने केल्या जाणाऱ्या वार्षिक अभ्यासानुसार प्रगणनेचा अहवाल २०१०मध्ये सादर करण्यात आला. यात १७ वाघांचे अस्तित्व दिसून आले. यानंतर ‘बफर झोन’चे कवच मिळाल्याने प्रकल्पाचा विस्तार झाला. २०१२मध्ये वाघांची संख्या वाढून ४९ झाली. ही मोठी उपलब्धी मानली जाऊन १०० चौरस किलोमीटरला वाघांची ५.२९ घनता इतकी नोंदविली गेली. ही घनता आता ६.५८ झाली आहे. नंतरच्या तीन वर्षांत; २०१५पर्यंत ताडोब्यातील व्याघ्रसंख्येत मोठी वाढ दिसून आली. वयस्क ३० वाघांसह त्यांचे २० बछडे असल्याचेही स्पष्ट झाले होते. आता ही संख्या वाढून ८६वर पोहचली आहे. मागील काही वर्षांत ८५-९०च्या दरम्यान ताडोब्यात वाढ असल्याचे तज्ज्ञांकडून अहवालात दर्शविण्यात येत आहे. प्रगणनेने यावर शिक्कामोर्तब झाले आहे. वाघांची संख्या स्थित असल्याचे सांगण्यात येत असतानाच प्रकल्पात बिबट्यांचे अस्तित्व वाढले आहे. ही संवर्धनाच्या दृष्टीने मोठी बाब असल्याचे जाणकार मानतात. यंदा बिबट्याची तिसऱ्यांदा प्रगणना करण्यात आली आहे. यापूर्वी व्याघ्रप्रगणना भारतीय वन्यजीव संस्थेद्वारा केली जात होती. मागील दोन वर्षांत त्यांच्यासह ताडोबा व्यवस्थापनाने पूर्ण जबाबदारी स्वीकारून कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे ताडोब्याची प्रगणना केली. यंदा क्षेत्रीय काम व विश्लेषण ताडोबा व्यवस्थापनाने केले. राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा, सह्याद्री, ताडोबा असे सहा व्याघ्रप्रकल्प आहेत. सर्वाधिक वाघांची संख्या ताडोब्यात आहे. वाघांचे ‘मॅटिर्निटी होम’ म्हणून हा प्रकल्प ओळखला जातो. प्रकल्पात वाघांचा प्रजनन दर अधिक आहे. तृणभक्षी प्राण्यांची संख्या मुबलक असल्यानेच ताडोब्यात व्याघ्रवाढ दिसून आल्याचे जाणकार सांगत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.