Nagpur | पालकमंत्री राऊतांनी घेतला बुस्टर डोज; आणखी कोणकोण आहेत बुस्टरसाठी फ्रंटलाईनवर?

आरोग्य कर्मचाऱ्याकडून बुस्टर डोस घेताना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत.

0

नागपूर : जिल्ह्यामध्ये सोमवार, 10 जानेवारीपासून प्रतिबंधात्मक मात्रा अर्थात बुस्टर डोस देणे सुरू झाले आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी जिल्ह्यामध्ये 2 हजार 737 नागरिकांनी हा बुस्टर डोस घेतला. यामध्ये नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचाही समावेश आहे. नागरिकांनी बुस्टर डोस घेण्याचे आवाहन डॉ. राऊत यांनी केले.

60 वर्षांवरील 1264 नागरिकांनी घेतला डोस

ग्रामीण भागातील केंद्रावर सोमवारी 484 आरोग्य कर्मचारी, 69 फ्रंटलाईन वर्कर व 60 वर्षांवरील 108 जण अशा 661 जणांनी बुस्टर डोस घेतला. तर शहरातील केंद्रावर 60 वर्षांवरील 1264 नागरिक, 110 फ्रंटलाईन वर्कर व 702 आरोग्य सेवक अशा 2,737 जणांनी बुस्टर डोस घेतला.

बुस्टर डोससाठी कोण पात्र?

लसीचे दोन डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी, तसेच 60 वर्ष व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना हा बुस्टर डोस घेता येतो. मात्रा घेतल्याच्या तारखेपासून नऊ महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असल्यास 10 जानेवारीपासून प्रतिबंधात्मक मात्रा अर्थात बुस्टर डोस घेण्यासाठी पात्र ठरू शकतात. अशा नागरिकांना शासनामार्फत मोबाईलवर मेसेज जात आहे. या सर्वांना हा बुस्टर डोस दिला जाणार आहे.

ऑनलाईन आणि नोंदणी पद्धतीने सुविधा उपलब्ध

फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्ष व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या व्यक्तींना कोरोना लसीचा तिसरा डोस देण्यात येणार आहे. यासाठी पात्र व्यक्तींनी ऑनलाईन पद्धतीने कोविन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. तिसरा डोस देताना लसीकरण केंद्रावर कोणतेही प्रमाणपत्र जमा किंवा दाखवायची आवश्यकता नाही. फक्त अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा, असे मनपाच्या वतीने कळवण्यात आले आहे. सर्व नागरिकांचे शासकीय केंद्रावर लसीकरण विनामूल्य होईल.

15 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांना आवाहन

सध्या कोव्हिड नियमावलीमुळे शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद करण्यात आल्या. त्यामुळे सन 2007 किंवा त्यापूर्वी जन्मलेले सर्व 15 ते 17 वर्षापर्यंतचे विद्यार्थ्यांनी 28 कोव्हॅक्सीन लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापनाने पुढाकार घेऊन आपल्या विद्यार्थ्यांकरिता आपल्या शाळेत लसीकरण व्हावे यासाठी त्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क करावा व 100 टक्के पात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण लवकरात-लवकर पूर्ण करावे.

Leave A Reply

Your email address will not be published.