अशा कामाचा हेतू कधीच शुद्ध नसतो’, न्यायालयाने सूजय विखेंना फटकारले

0 27

औरंगाबाद, 04 मे : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आपल्या मतदारसंघात परस्पर रेमडेसीवीर इंजेक्शनचा (remdesivir injection) वाटप करणारे भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil)  यांना न्यायालयाने चांगलेच सुनावले. ‘गैरमार्गाने केलेल्या कामाचा हेतू कधीच शुद्ध राहत नाही’ अशा शब्दांत न्यायालयाने फटकारून काढले.

सुजय विखे पाटील यांनी अहमनगर जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्यामुळे दिल्लीतून रेमडेसीवीर इंजेक्शन आणून वाटप केले होते. राज्यात तुटवडा असताना सुजय विखे यांनी गुपचूप केलेल्या प्रकारामुळे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर खंडपीठाच्या न्यायाधीशांना परखड मत व्यक्त करत सूजय विखेंना फटकारून काढले आहे.

तुम्ही जर एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी काम करत असताना बेकायदेशीर मार्गाचा वापर केला तर तो कधी शुद्ध नसतो, अशा शब्दांत न्यायमूर्ती घुगे यांनी सूजय विखेंची कानउघडणी केली.

तसंच, सूजय विखे यांनी कोणतेही गुन्हेगारीचे काम केले नाही. रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. लोकांची मदत करण्यासाठी त्यांनी विमानाने जाऊन रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा आणला होता आणि तो लोकांमध्ये वाटला होता, हा गुन्हा ठरू शकत नाही, असा युक्तीवाद सूजय विखेंच्या वकिलांनी केला होता, असं वृत्त  दिले आहे.

तसंच, सूजय विखे यांनी रेमडेसीवीर इंजेक्शन विमानातून घेऊन आल्यानंतर व्हिडीओ चित्रित केला. हा ड्रामा करण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. आपण मतदारसंघातील खासदार असून दिल्लीत आपले वजन वापरून कशा प्रकारे इंजेक्शन्स आणली, हे सांगण्याचा दिखाऊपणा होता, तो टाळता आला असता, असे खडेबोलही न्यायमूर्तींनी सुनावले.

’10 हजार नव्हे 1200 इंजेक्शन आणले होते’

सूजय विखे यांनी 10 हजार रेमडेसीवीर इंजेक्शन आणल्याचा दावा केला जात होता. पण, मुळात त्यांनी 1200 इंजेक्शनचे बॉक्स आणले होते, अशी माहिती सूजय विखेंच्या वकिलांनी दिली. अहमदनगरमधील एका डॉक्टरांनी पुण्यातील एका कंपनीकडे 1700 इंजेक्शनची ऑर्डर दिली होती. त्यापैकी फक्त 500 मिळाल्या होत्या. उर्वरीत इंजेक्शन हे सूजय विखे यांनी चंदीगड येथील एका कंपनीत जाऊन आणले होते. यासाठी डॉ. पाटील फाऊंडेशनकडून 18,14,400 रुपये देण्यात आले, अशी माहितीही न्यायालयात देण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी बुधवारी 5 मे रोजी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.