वनांतील जलस्त्रोत पडले कोरडे

वन्यप्रण्यांची मानवी वसतीत धाव तभा वृत्तसेवा सडक अर्जुनी

0 7

वाढत्या तापमानाने वनांतील पाण्याचे स्त्रोत कोरडे पडले आहेत. परिणाी पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वसतीकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. तापमानात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर होत आहे. नदी, नाले, तलाव, बोड्या कोरडे पडल्याने मानवासह वन्यप्रण्यांची पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे. जंगलातील पाणवठे देखील कोरडे पडले आहेत. वाढते तापमान व पाण्याअभावी वन्यप्रण्यांचा मृत्यू होत आहे. तालुक्यात वशीकरण पहाडी परिसरात नुकताच असा प्रकार उघडकीस आला आहे.

गोंदिया जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील अनेक सिंचन प्रकल्प आणि तलाव कोरडे पडले आहेत. परिणामी तलावांच्या जिल्ह्यात मे महिन्यात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. तापमानात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर दिसून आला. धान व अन्य पिकांना सिंचनासाठी होत असलेला पाण्याचा वापर यामुळेही पाण्याची स्त्रोते आता कोरडी पडली आहेत. वनांतील पाण्याचे स्त्रोत आटल्याने वन्यप्रण्यांना पाण्यासाठी गावाकडे धाव घ्यावी लागत आहे. पाण्याअभावी व उष्णतेच्या दाहकतेमुळे रानगव्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे वन आणि वन्यजीव विभागाचे उपाययोजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नवेगाव-नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पात 256 पाणवठे असून त्यापैकी 78 नैसर्गिक स्त्रोतांचे तर 154 कृत्रिम पाणवठे आहेत. 24 तलावही या क्षेत्रात आहेत.154 कृत्रिम पाणवठ्यात पाणीपुरवठा व्हावा यासाठी149 हातपंप तयार केले आहेत.त्यापैकी 110 हातपंप सौरऊर्जेवर चालणारे आहेत. 13 पाणवड्यात 3 टँकरच्या साहाय्याने पाण्याची सोय केली जात आहे. वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकावे लागत नसल्याचे वन्यजीव विभागाचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. वन्यप्रेमींनी जंगलातील कुठल्याच पाणवठ्यात पाण्याची सोय करण्यात आली नसल्याचा आरोप केला आहे. काही निसर्ग प्रेमी संस्थांनी आवाज उठविल्यानंतर वन्यजीव विभागाने टँकर लावून पाण्याची सोय केल्याची माहिती दिली.

नवेगाव-नागझिरा अभयारण्यातील पुनर्वसीत थाडेझरी गावाजवळील तलाव पूर्णतः कोरडा पडला आहे. थाडेझरीपासून नागझिरा अभयारण्य 7 किमी अंतरावर आहे. सन 1998 पासून थाडेझरी येथील तलावाचे वन्यजीव विभागाने खोलीकरण केले नाही. मार्च-एप्रिल महिन्यातच तलाव कोरडा पडतो. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहे. हीच बाब हेरून शिकारी वन्यप्राण्यांची शिकार करतात. उल्लेखनिय म्हणजे कोट्यवधी रुपये वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्यावरील उपाययोजनेवर खर्च केले जातात. मात्र उपाययोजना शोधूनही सापडत नाही.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.