कोरोनाची तिसरी लाट मराठवाड्याच्या उंबरठ्यावर; तूर्त लॉकडाऊन नाही, मात्र खबरदारीची गरज
Corona In Marathawada :सध्याची परिस्थिती तिसऱ्या लाटेची चाहूल असून दुसऱ्या लाटेत दोन हजार रुग्ण होते, यावेळी एकाच दिवसात १० हजार रुग्ण आढळण्याचे प्रमाण राहू शकते.
औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोना (corona virus ) , ओमायक्रॉन ( Omicron Variant ) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर ( Sunil Kendrekar ) यांनी दोन दिवस बैठक घेतली आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांची चार तास बैठक घेऊन जिल्हानिहाय काय परिस्थिती आहे, याचा आढावा घेत विभागात लॉकडाऊन करणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. शाळांबाबत स्थानिक जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशा सूचना विभागीय प्रशासनाने दिल्या आहेत.
सध्याची परिस्थिती तिसऱ्या लाटेची चाहूल असून दुसऱ्या लाटेत दोन हजार रुग्ण होते, यावेळी एकाच दिवसात १० हजार रुग्ण आढळण्याचे प्रमाण राहू शकते. ७० ते ८० टक्के रुग्ण घरीच बरे होतील. ज्यांना जास्त त्रास होईल, त्यांच्यावर उपचार करावे लागतील. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तयारी खूप केली असली, तरी रुग्णसंख्या वाढल्यानंतर ताण वाढू शकतो. सध्या तीन ते चार दिवसात रुग्ण बरे होत आहेत. परंतु घरात एक जण पॉझिटिव्ह आला तर इतरांना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्यावीच लागणार आहे. अशा सूचना आयुक्तांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
दुसऱ्या लाटेत अशी होती परिस्थिती
१ मार्च २०२१ रोजी विभागातील आठ जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण मिळून ६८७ रुग्ण कोरोनाग्रस्त होते. १६ मार्च रोजी हा आकडा २६०० पर्यंत गेला होता. शहरी भागात १४४२, तर ग्रामीणमध्ये ११५८ रुग्णांची नोंद झाली होती. ५३६ कन्टेन्मेंट झोन विभागात होते. दुसऱ्या लाटेत मृत्यूदर कमी असणे, एवढीच जमेची बाजू त्यावेळी होती.
विभाग तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर
मराठवाडा कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असून, नववर्षाच्या पहिल्या पाच दिवसात विभागात ६०७ वर कोरोना रुग्णांची भर पडली आहे. चार महिन्यानंतर रुग्णसंख्येचा आकडा वाढला आहे. विभागात १ जानेवारीला ६६ रुग्ण होते. त्यात औरंगाबाद १५ तर लातूरमधील १८ रुग्णांचा समावेश होता. २ जानेवारीला १०८ नवीन रुग्णांची भर पडली. ३ जानेवारीला पुन्हा १११ नवीन रुग्णांची भर पडली. ६०७ रुग्णांमध्ये औरंगाबादच्या २१६ रुग्णांचा समावेश आहे.