TikTok स्टार फन बकेट भार्गवला बलात्कार प्रकरणी अटक, अल्पवयीन पीडिता चार महिन्यांची गर्भवती

भार्गवने पीडितेला आक्षेपार्ह व्हिडीओंवरुन ब्लॅकमेल करत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे (TikTok Star Fun Bucket Bhargav Raping )

0 66

हैदराबाद : फन बकेट भार्गव (Fun Bucket Bhargav) या नावाने प्रसिद्ध असलेल्या ‘टिकटॉक स्टार’ला बलात्कार प्रकरणात अटक झाली आहे. विशाखापट्टणममध्ये राहणाऱ्या 14 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्या अंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे अल्पवयीन पीडिता चार महिन्यांची गर्भवती आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी फन बकेट उर्फ चिप्पाडा भार्गव याच्याविरोधात कारवाई केली. (TikTok Star Fun Bucket Bhargav Arrested For Allegedly Raping Minor Girl in Andhra Pradesh)

आक्षेपार्ह व्हिडीओवरुन ब्लॅकमेल

फन बकेट भार्गव याने पीडित तरुणीचे टिकटॉक व्हिडीओ पाहून तिला अनेक ऑफर दिल्या होत्या. त्याने तिला प्रपोज केले होते, मात्र तिने त्याचा प्रस्ताव धुडकावला होता. मात्र तुझे आक्षेपार्ह व्हिडीओ माझ्याकडे आहेत, असं सांगून भार्गवने तिला ब्लॅकमेल केले. आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, अशी माहिती दिशा सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेम काजल यांनी दिली.

पीडितेच्या आई वडिलांनी विशाखापट्टणममधील पेंढुर्ती पोलिस स्थानकात फन बकेट भार्गव याच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. बलात्कार पीडिता चार महिन्यांची गरोदर असल्याचं समजल्यानंतर हा प्रकार तिच्या कुटुंबीयांपुढे उघड झाला.

‘ओ माय गॉड!’ व्हिडीओमुळे लोकप्रिय

फन बकेट भार्गव याला पोलिसांनी हैदराबादमध्ये अटक केली. भार्गव हा ‘ओ माय गॉड! ओ माय गॉड!’ सारख्या टिकटॉक व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्याच्यावरील बलात्काराच्या आरोपांमुळे त्याच्या फॉलोअर्सनाही मोठा धक्का बसला आहे.

संबंधित केस ही पॉक्सो कायद्याअंतर्गत येत असल्यामुळे विशाखापट्टणमच्या दिशा पोलिसांकडे ती हस्तांतरित करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील महिला आणि लहान मुलांविरोधातील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी दिशा नगर पोलिस स्टेशन उभारण्यात आले आहेत. 2019 मध्ये हैदराबादेत पशुवैद्यक तरुणीवरील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानंतर ही तरतूद करण्यात आली. (TikTok Star Fun Bucket Bhargav Raping )

भार्गवची कार आणि मोबाईल जप्त

फन बकेट भार्गव याला 3 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पांढऱ्या रंगाची निसान कार आणि मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पीडितेचे फोटो सोशल मीडियावर वापरणाऱ्या व्यक्तींविरोधात सक्त कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.