कडक लॉकडाउनची आज होणार घोषणा!

मुख्यमंत्री आज निर्णय घेण्याचे संकेत

0 46

संचारबंदी लागू करूनही राज्यातील रुग्णसंख्येत अपेक्षित घट होत नसल्याने संपूर्ण टाळेबंदी लागू करावी, असा सूर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटला. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बुधवारी निर्णय घेऊन तसे आदेश लागू करण्याचे संकेत आहेत.

करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू करूनही त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. लोकांना जरब बसविण्यासाठी कठोर उपाय योजण्याची गरज सर्वच मंत्र्यांनी व्यक्त के ली. त्यानुसार अत्यावश्यक सेवा आणि सार्वजनिक वाहतूक वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात येणार असून, लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, बुधवारी याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोनास्थितीचा आढावा घेण्यात आला. त्या वेळी बहुतांश मंत्र्यांनी सध्याच्या निर्बंधांना लोक जुमानत नसल्याने कठोर टाळेबंदी लागू करण्याची मागणी के ली. बुधवारी रात्री आठपासून टाळेबंदी लागू करण्याबाबत बैठकीत निर्णय झाला असून, त्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे मुख्यमंत्री जाहीर करतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. मात्र, रेल्वे सेवा बंद करण्याची शिफारस राज्य सरकार करणार नाही. औषध दुकाने, रेल्वे, एसटी आणि स्थानिक परिवहन सेवा तसेच भाजीपाला, दूध या सेवा वगळता सर्व व्यवहारांवर निर्बंध लागू करण्याबाबत निर्णय झाल्याचे समजते.

रुग्णसंख्या कमी करण्यासाठी टाळेबंदी हाच एकमेव उपाय असल्याचे मत मंत्र्यांनी व्यक्त के ले. मंत्र्यांनी मागणी केली असली तरी टाळेबंदी किं वा लोक रस्त्यावर येऊ नयेत म्हणून अधिक कठोर निर्बंध लागू करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे सांगण्यात आले.

राज्यात ६२ हजार नव्या रुग्णांची भर

मुंबई : राज्यातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून मंगळवारी ६२ हजार ९७ नव्या रुग्णांची भर पडली. दिवसभरात ५४ हजार २२४ रुग्ण करोनामुक्त झाले. गेल्या २४ तासांत तब्बल ५१९ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात सहा लाख ८३ हजार ८५६ उपचाराधीन रुग्ण आहेत.

देशात २४ तासांत १,७६१ करोनाबळी

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत करोनाचे दोन लाख ५९ हजार १७० रुग्ण आढळले. याच कालावधीत १,७६१ रुग्णांचा मृत्यू झाला. दैनंदिन करोनाबळींचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. देशातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येने २० लाखांचा टप्पा ओलांडला.

दिवसभरात…

* देशात गेल्या २४ तासांत ३२ लाख जणांना लसमात्रा. आतापर्यंत १२,७१,२९,११३  जणांचे लसीकरण

* कॉंग्रेस नेते राहुल गांधी, आनंद शर्मा यांना करोनाची लागण

* झारखंडमध्ये २२ ते २९ एप्रिलपर्यंत टाळेबंदी

* दिल्लीत प्राणवायूची तीव्र टंचाई. प्राणवायू पुरवठ्याची अरविंद केजरीवाल यांची पुन्हा केंद्राकडे मागणी

* लसमात्रा मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाची नाराजी. शक्य तितक्या सर्वांना लस देण्याची सूचना

* उत्तर प्रदेशातील पाच शहरांत टाळेबंदीच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती.

Leave A Reply

Your email address will not be published.