व्यापाऱ्याचा विश्वासघात केला अन् चक्क २१ लाखांचे सोयाबीन केले लंपास

0

वाशिम: जिल्ह्याच्या मानोरा येथील धान्याचे व्यापारी गोपाल राधेश्याम हेडा यांचे २१ लाख ४० हजार ६२४ रुपये किमतीचे सोयाबीन विश्वासघात करून ट्रक व त्यामधील माल लंपास करणाऱ्या चोरट्यांना तांत्रिक मुद्याच्या आधारे तपास करत दोन आरोपीना पोलिसांनी मध्य प्रदेश येथून अटक केली आहे. तर गुन्ह्यातील वाहनसह ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, व्यापारी गोपाल हेडा (मानोरा) यांनी १६ डिसेंबर रोजी मानोरा पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले की, त्यांनी ८ डिसेंबर रोजी तिरुपती ट्रान्सपोर्ट कंपनीचा १४ चाकी ट्रक (क्र. सीजी १० एक्यू ६०४०) मध्ये ३०३ क्विंटल सोयाबीन ज्याची किंमत २१,४०,६२४ असून हमालामार्फत भरून मानोरा येथून जयसिंगपूर (सांगली) येथे पाठविला होता. परंतु ट्रकचा चालक ईश्वरसिंह बापुलाल सौधिया, आणि नारायणसिंह बिरमसिंह सौधिया (खिलचीपूर, जि. राजगड, मध्य प्रदेश) यांनी विश्वासघात करून ट्रक व त्यामधील माल लंपास केला. अशा आशयाच्या फिर्यादीवरून मानोरा पोलिसांनी नमूद दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला.

दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी तपासासाठी विशेष पथक गठीत केले. सहायक पोलीस निरीक्षक महेश कुचेकर यांनी गोपनीय माहिती व तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे पोलीस कर्मचारी संदीप बरडे, शकील मुन्नीवाले, पंकज खाडे यांना खिलचीपूर, जि. राजगड, मध्य प्रदेश येथे रवाना करून त्या ठिकाणी गुन्ह्यातील ट्रक किंमत २५ लाख रुपये व ३०३ क्विंटल सोयाबीन किमत २१ लाख ४० हजार ६२४ रुपये असा एकुण ३६ लाख ४६ हजार ६२४ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन मानोरा येथे परत आणण्यात आले.

तसेच नमूद दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयासमक्ष हजर केले असता, दोघांनाही २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश कुचेकर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.