सोबत राहत नसल्याच्या रागातून तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

सोबत राहत नसल्याने तसेच दुचाकीवर न बसल्याच्या रागातून एका तरुणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना राबोडी पोलिसांनी अटक केले आहे. यातील एका आरोपीने या तरुणाच्या दिशेने गोळी देखील झाडली होती.

0 21

ठाणे : सोबत राहत नसल्याने तसेच दुचाकीवर न बसल्याच्या रागातून एका तरुणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना राबोडी पोलिसांनी अटक केले आहे. यातील एका आरोपीने या तरुणाच्या दिशेने गोळी देखील झाडली होती. सुदैवाने तरुणाला गोळी लागली नाही. मात्र, ठोशाबुक्क्यांनी तसेच चाकूने आणि पिस्टलच्या मागील लोखंडी बाजूने तरुणाला आरोपींनी मारहाण केली आहे.

राबोडीतील क्रांतीनगरमध्ये राहणारा मोहमद जैद मंजूर खान (३०) हा मित्रासह मंगळवारी दुसरी राबोडीतील तपासेनगर परिसरात बसला होता. त्यावेळी त्याच्या ओळखीचा आरोपी शब्बीर अब्दुल गौस आणि त्याचा साथीदार त्याठिकाणी आले. खान हा त्यांच्यासोबत राहत नसल्याचा तसेच आरोपींनी दुचाकीवर बसण्यास सांगूनही तो दुचाकीवर न बसल्याच्या गोष्टीचा आरोपींना राग आला. आणि शब्बीरच्या साथीदाराने खान याला ठोशाबुक्क्यांनी पोटात मारहाण केली. तसेच चाकूने दुखापत केली. त्यानंतर शब्बीर याने पिस्टल काढून पिस्टलची मागील बाजू खान याच्या डोक्यावर मारली. आणि खान याच्यावर पिस्टल रोखून त्याच्या दिशेने गोळीबारही केला. परंतु ही गोळी खान याला लागली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. खान याच्या तक्रारीनंतर राबोडी पोलिस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक आर. एस. शिरतोडे, पोलिस निरीक्षक एस. आर. हुंबे, सहाय्यक पोलिस निरीक्षक धोंगडे तसेच अन्य अधिकारी आणि कर्मचारी यांनी आरोपींचा शोध सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे शब्बीर शेख (३०), मोहन मल्लेश माचारला (२२) यांच्या मुसक्या आवळत या गुन्ह्याची उकल केली. कॅसलमिल परिसरात राहणारा शब्बीर चालकाचे काम करतो. दुसरा आरोपी ठाण्यातीलच गोकुळनगरमध्ये राहत असून तो काहीच काम करत नाही. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले पिस्टलही पोलिसांनी जप्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.