Yashpal Sharma Death : भारतीय क्रीडा जगतावर शोककळा, अनेकांनी वाहिली यशपालजींना श्रद्धांजली

भारताला 1983 चा विश्वचषक जिंकवून देणाऱ्या संघातील एक खेळाडू असणारे दिग्गज भारतीय क्रिकेटपटू य़शपाल शर्मा यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय क्रीडा जगतात दुखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

0 20

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट इतिहासातील एक दिग्गज क्रिकेटर, मधल्या फळीतील दमदार फलंदाज असणारे  माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा (Yashpal Sharma) यांचे वयाच्या 66 व्या वर्षी निधन झाले आहे. मंगळवारी (13 जुलै) सकाळच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने शर्मा यांचे निधन झाले. भारतीय क्रिकेटचा चेहरा-मोहरा बदलण्यात महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या 1983 विश्वचषक जिंकवून देणाऱ्या संघामध्ये यशपाल हे महत्त्वाचे खेळाडू होते. त्यांच्या निधनाने भारतीय क्रीडा जगतावर शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गज त्यांच्या जाण्याने दुख व्यक्त करत आहेत. यशपालजी त्यांच्या मागे पत्नी रेणू शर्मा, दोन मुली पुजा शर्मा, प्रीति शर्मा आणि मुलगा चिराग शर्मा यांना सोडून गेले आहेत.

यशपाल यांच्या निधनाची बातमी येताच भारतीय क्रिकेट जगतातील अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनीही ट्विट करत दुख व्यक्त केले. ते म्हणाले,  ‘महान क्रिकेटपटू तसेच 1983  विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेट टीमचे सदस्य श्री यशपाल शर्मा यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. प्रभु श्री राम त्यांच्या आत्म्याला शांती देवो. तसेच त्याच्या परिवाराला हे दुख सहन करण्याची ताकद देवो.ॐ शांति!

 

माजी दिग्गज क्रिकेटपटूंनीही वाहिली श्रद्धांजली

यशपालजी यांना अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी श्रद्धांजली वाहिली. यामध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, लक्ष्मण यांच्यासह त्याचे सहकारी श्रीकांत यांचाही समावेश आहे. सचिनने ट्विटमध्ये लिहिले आहे की,“यशपाल शर्मा यांच्या निधनाबद्दल ऐकून मी सुन्न झालो आहे. 1983 विश्व चषकातील त्यांच्या आठवणी शानदार आहेत. भारतीय क्रिकेटसाठी त्यांचे योगदान कायम स्मरणात राहिल. त्यांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना आहेत.”

 

यशपाल यांच्यासह 1983 च्या विश्वचषकात सोबत खेळलेले त्यांचे सहकारी कृष्माचारी श्रीकांत यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “माझा माजी सहकारी आणि मित्र यशपाल शर्माच्या निधनाची बातमी ऐकून मी खूप दुखी आहे. 1983 विश्व चषकात ते एक मुख्य हिरो होते. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो.”

 

आयपीएल संघानीही व्यक्त केले दुख

आयपीएल संघानी देखील त्यांच्या ट्विटरवरुन यशपालजी यांना श्रद्धांजली वाहत दुख व्यक्त केले आहे. यामध्ये दोनदा आयपीएल जिंकणारी कोलकाता नाईट रायडर्स, आरसीबी, पंजाब किंग्स यांचाही समावेश आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.