१८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण; योगी सरकारचा निर्णय

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

0 8

१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्यास केंद्राने परवानगी आहे. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारने १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करोना पॉझिटिव्ह आढळले असून सध्या विलगीकरणात आहेत.

उत्तर प्रदेशात वीकेण्ड लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत हा लॉकडाउन असेल. तसंच नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आलेला असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टींना परवानगी नाही.

योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, “मंत्रिमंडळ बैठकीत उत्तर प्रदेशातील १८ वर्षाच्या पुढील सर्वांना करोना लस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचा पराभव होईल आणि भारत जिंकेल”.

योगी आदित्यनाथ यांनी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्याचा तसंच वयोगटाप्रमाणे डेटा तयार करण्याचा आदेश दिला आहे. सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशात आरोग्य यंत्रणेसमोर हे मोठं आव्हान असणार आहे.

याशिवाय आसामनेही मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

सध्याच्या घडीला ४५ वर्षांवरील नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत.

लॉकडाउनसाठी योगी सरकारचा नकार
उत्तर प्रदेशमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे लखनऊ, वाराणसी, कानपूर नगर, गोरखपूर व अलाहाबाद (प्रयागराज) या शहरांमध्ये आठवडाभराचा सक्तीला लॉकडाउन लागू करावा, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला होता. लॉकडाउनला विरोध असणाऱ्या योगी सरकारने याविरोधीत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाकडून योगी आदित्यनाथ सरकारला दिलासा मिळाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या लॉकडाउनच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली.

उत्तर प्रदेश प्रशासनाने मात्र लॉकडाउनच्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत सोमवारीच संदिग्ध प्रतिसाद दिला. अतिरिक्त मुख्य सचिव नवनीत सेहगल यांनी सांगितलं की, “करोनाप्रसार रोखण्यासाठी निर्बंध आवश्यकच आहेत. उत्तर प्रदेश सरकारने यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. मात्र जीव वाचवण्याइतकेच रोजगार वाचवणंही गरजेचं आहे. त्यामुळे शहरांमध्ये सध्या तरी पूर्ण लॉकडाउन राबवणे अशक्य आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या वेळेत संचारबंदीचे आदेश देण्यात आले असून १५ मे पर्यंत संपूर्ण राज्यात दर रविवारी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे”.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.