रुग्णालयासमोर लग्नाची वरात पाहून रुग्णवाहिका चालकाने केलं असं काही; सगळेच झाले अवाक

उत्तराखंडमधील घटना

0 92

करोनामुळे सध्या आरोग्य यंत्रणेवर खूप ताण आहे. करोना रुग्णांसाठी आरोग्य कर्मचारी दिवसरात्र काम करत असून त्यांच्यावर खूप तणाव आहे. अशावेळी हा तणाव कमी कसा करता येईल यासाठी प्रयत्न सुरु आहे. यादरम्यान एक रुग्णवाहिका चालक पीपीई किटमध्ये लग्नाच्या वरातीत नाचत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्याचा रहिवासी असणाऱ्या महेशने सतत करोना रुग्णांना नेत असल्याने खूप तणाव आला होता, पण लग्नाच्या वरातीत नाचल्याने तणाव थोडा कमी झाला असल्याचं म्हटलं आहे.

डॉक्टर सुशीला तिवारी सरकारी रुग्णालयात महेश रुग्णवाहिका चालक म्हणून काम करतो. “मी सतत करोना रुग्णांना रुग्णालयात नेण्याचं काम करत आहे. घरी जाण्यासही वेळ मिळत नसल्याने मला खूप तणाव जाणवत होता. रुग्णालयासमोर लग्नाची वरात पाहिल्यानंतर मी स्वत:ला रोखू शकलो नाही,” असं महेशने सांगितलं आहे.

महेश काम करत असलेल्या रुग्णालयासमोरुन ही वरात निघाली होती. बँड बाजाचा आवाज ऐकल्यानंतर त्याला राहावलं नाही आणि रुग्णवाहिकेतून बाहेर येत त्याने वरातीत भाग घेतला. पीपीई किटमध्ये महेशला नाचताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. यावेळी काहींनी भीतीपोटी त्याच्यापासून अंतरही ठेवलं.

“मी जवळपास १० मिनिटं नाचत होतो आणि सगळं काही विसरलो. माझ्यासाठी हा खूप मोठा दिलासा होता. नाचल्यानंतर मी सगळा तणाव विसरलो आणि मनालाही थोडं बरं वाटलं. यामुळेच मी नाचलो,” असं महेश म्हणतो.

रुग्णालयातील मानसोपचारतज्ञ युवराज पंत यांनी सतत होणारे करोना रुग्णांचे मृत्यू आणि शवविच्छेदनासाठी ते मृत्यू नेणे यासाठी रुग्णवाहिका २४ तास सुरु आहे. अशा परिस्थितीत चालक खूप तणावात आहेत. तणावातून आराम मिळण्यासाटी शेकिंग थेरपी आहे. योगा. डान्स, स्पोर्ट्सच्या माध्यमातून तणाव कमी करु शकतो असं सांगितलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.