चंद्रपूर जिल्हय़ात लसीकरण, करोनाचाचणी केंद्र बंद

मार्च महिन्यात ५६ रुपयाला मिळणारे किट एप्रिल महिन्यात १२० रुपयांत विक्रीला

0 28

चंद्रपूर : करोनाचा प्रादुर्भाव अतिशय वेगाने होत असताना या जिल्हय़ात करोना अ‍ॅण्टीजन व आरटीपीसीआर व्हीटीएम किटचा तुटवडा असल्याने बहुसंख्य चाचणी केंद्र बंद पडली आहेत. तर लस उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्राला ताळे लागले असल्याचे चित्र शुक्रवारी येथे बघायला मिळाले. दरम्यान, अ‍ॅण्टीजन चाचणी किट मार्च महिन्यात ५६ रुपयात मिळत होती. आता त्याच किटसाठी ११० ते १२० रुपये घेतले जात आहे. हे दर खूप जास्त प्रमाणात वाढवण्यात आले आहेत.

महापौर राखी कंचर्लावार यांनी अ‍ॅण्टीजन व आरटीपीसीआर व्ही.टी.एम. किटचा मुबलक पुरवठा करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे केली. जोपर्यंत पुरवठा होत नाही तोपर्यंत आम्हाला उपरोक्त किट आपल्या मार्फत चंद्रपूर शहर महापालिकेला पूर्वीच्या दराप्रमाणे पुरवण्यात याव्यात, अशी मागणी महापौर  कंचर्लावार यांनी केली आहे.

लस उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहीम थंडबस्त्यात आहे. शुक्रवारी जिल्हय़ातील सर्वच लसीकरण केंद्र बंद होते. लसीकरणासाठी जिल्हय़ात दोनशे टिम कार्यरत आहे. तर सहा खासगी केंद्र आहेत. मात्र दोन दिवसांपासून खासगी केंद्रावर लस नाही. गुरुवारी काही शासकीय केंद्र सुरू होते. शुक्रवारी हे सर्व केंद्र बंद पडल्याचे चित्र येथे बघायला मिळाले. साधारणत: मंगळवारपासून पुन्हा लसीकरण केंद्र सुरू होण्याचा अंदाज आहे.

चंद्रपूर कोविड बेड मॅनेजमेंट पोर्टल कार्यान्वित

चंद्रपूर : वेगाने होणारे करोना संक्रमण बघता बाधित रुग्ण व नातेवाईकांची कोविड रुग्णालयामध्ये प्राणवायू, व्हेंटिलेटर खाट मिळविण्यासाठी जीवघेणी धावपळ सुरू आहे. मात्र बाधिताला सहज खाट उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने चंद्रपूर कोविड बेड मॅनेजमेंट पोर्टल, हे स्वॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्यानुसार आता करोना बाधिताने नोंदणी करताच प्रतीक्षा यादीनुसार त्याला शासकीय व खासगी रुग्णालयामध्ये खाट उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र दिन किंवा सोमवारपासून हे पोर्टल सुरू होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.