भोगीच्या भाज्या शंभरीपार ; हवामान बदलाचा लागवडीवर परिणाम झाल्याने आवक कमी

भोगीसाठी लागणाऱ्या भाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली असून, बाजारात भाज्यांचा तुटवडा जाणवत आहे.

0

पुणे : भोगीसाठी लागणाऱ्या भाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली असून, बाजारात भाज्यांचा तुटवडा जाणवत आहे. घाऊक बाजारात भाज्यांची आवक अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने किरकोळ बाजारात भोगीच्या भाज्यांचे दर किलोमागे शंभरीपार गेले आहेत. मध्यंतरी झालेला अवकाळी पाऊस, हवामानातील बदल तसेच अचानक वाढलेल्या थंडीमुळे भाज्यांची आवक कमी होत आहे. भाज्यांच्या लागवडीवरही परिणाम झाला आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात भोगीसाठी लागणाऱ्या भाज्यांची आवक मंगळवारी (११ जानेवारी) अपेक्षेएवढी झाली नाही. भाज्यांना मागणी वाढली असून, आवक कमी पडत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील प्रमुख भाजीपाला व्यापारी विलास भुजबळ यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचा बाजारात तुटवडा जाणवत आहे. मटार, गाजर वगळता बहुतांश भाज्यांचे दर तेजीत आहेत. मटार आणि गाजर या दोन भाज्यांची आवक पररराज्यातून होत आहे. हवामान बदलामुळे लागवडीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे आवक कमी होत आहे, असे निरीक्षण भुजबळ यांनी नोंदविले.   गेले पंधरा ते वीस दिवस भाज्यांचे दर तेजीत आहेत. भोगीसाठी अनेक शेतकरी भाज्या राखून ठेवतात. भोगीच्या आधी दोन दिवस भाज्यांची तोडणी करून विक्रीस पाठविल्या जातात. मात्र, सध्या बाजारात भाज्यांची आवक अपुरी आहे.  डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात राज्यात वेगवेगळय़ा भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे लागवडीवर परिणाम झाला. जानेवारी महिन्यात अचानक थंडीत वाढ झाली. हवामानात होणाऱ्या बदलांमुळे भाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे.

– विलास भुजबळ, भाजीपाला व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड

भाज्यांचे प्रतिकिलोचे दर

पावटा   १२० ते  १४० रुपये

पापडी   १०० ते १२० रुपये

वांगी   १४० ते  १६० रुपये

मटार   ७०  ते ८० रुपये

गाजर   ५० ते ६० रुपये

बोरे ८०   ते  १०० रुपये

 

Leave A Reply

Your email address will not be published.