5 कोटींच्या आंतरराष्ट्रीय ट्रॅकची ऐशीतैशी, थेट VIP मंत्र्यांच्या गाड्याच केल्या उभ्या!

0 17

या ट्रॅकवरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar), राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार (sunil kedar) आणि राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या गाड्या उभ्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली

पुणे : पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी (mahalunge balewadi) परिसरात उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात (international sports university pune) सुमारे 5 कोटी रुपये खर्च करून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक उभारला आहे. पण, या ट्रॅकवरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar), राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार (sunil kedar) आणि राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या गाड्या उभ्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

बालेवाडी परिसरात उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार आणि राज्यमंत्री अदिती तटकरे दाखल झाले होते.  तेव्हा त्यांच्या गाड्यांचा ताफा चक्क मुख्य अॅथलेटिक्स स्टेडियमच्या ट्रॅकवर उभा करण्यात आल्या होत्या. शासकीय क्रीडा अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे हा प्रताप घडून आल्याने क्रीडा क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे.

सुमारे 5 कोटी रुपये खर्च करून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक उभारला गेला आहे. खेळाडूंच्या सरावा व्यतिरिक्त इथं पायी चालण्याचीही परवानगी नसते. हे माहीत असून देखील, आलेल्या मंत्र्यांचे दोन मजले चढण्याच श्रम वाचावं आणि आपल्याला शाबासकी मिळावी  यासाठी क्रीडा अधिकाऱ्यांनी केल्या या करामतीमुळे  क्रीडा विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

या आधी आजी-माजी राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय क्रीडा मंत्री अनेकांनी शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मुख्य अॅथलेटिक्स स्टेडियमला भेट दिली आहे. मात्र, कोणीच अॅथलेटिक्स ट्रॅकवर VIP गाड्या पार्क केल्या नव्हत्या.

याबाबत क्रीडा संकुलातील  क्रीडा अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी हात वर केले. मात्र, क्रीडामंत्री सुनील केदार यांनी मात्र ह्या प्रकारावर प्रतिक्रिया दिली. ‘क्रीडांगणाचा वापर राजकीय कार्यक्रम, समारंभासाठी न होता ते खेळासाठीच वापरले जातील. मात्र हे सगळं क्रीडा विद्यापीठ सुरू झाल्यावर होईल’ असं केदार यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.