जिल्ह्य़ात मतदारयादी शुद्धीकरण मोहीम

ऑक्टोबर २०१९ मध्ये पालघर जिल्ह्यत १९ लाख ५१ हजार ६६८ मतदार संख्या होती. गेल्या पावणेदोन वर्षांंत त्यामध्ये ९२ हजार ६२१ मतदारांची वाढ झाली आहे.

0 1

सव्वा लाख नावे छायाचित्राविना तर चार हजार दुबार नोंदणी

पालघर :  मतदारयाद्यांच्या पाहणीत सुमारे सव्वा लाख  मतदारांचे छायाचित्र समाविष्ट नसल्याचे तर चार हजार मतदारांची दुबार नोंदणी झाल्याचे स्पष्ट झाल्याने पालघर जिल्ह्यतील मतदारयाद्यांची शुद्धीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.  या मोहिमेअंतर्गत होणाऱ्या सर्वेक्षणात प्रतिसाद न मिळणाऱ्या मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत.

ऑक्टोबर २०१९ मध्ये पालघर जिल्ह्यत १९ लाख ५१ हजार ६६८ मतदार संख्या होती. गेल्या पावणेदोन वर्षांंत त्यामध्ये ९२ हजार ६२१ मतदारांची वाढ झाली आहे. जिल्ह्यतील मतदार संख्या २० लाख ४४ हजार २८९ झाली आहे. मतदारयादीमध्ये मतदारांचे छायाचित्र समाविष्ट करण्यासाठी अनेकदा कार्यक्रम हाती घेण्यात आल्यानंतर देखील सद्य:स्थितीत एक लाख २१ हजार ४८१ मतदारांची छायाचित्रे उपलब्ध झाली नाहीत. त्यापैकी नालासोपारा विधानसभा क्षेत्र ७७ हजार, बोईसर विधानसभा क्षेत्रात १५ हजार तर पालघर विधानसभा क्षेत्रात साडेदहा हजार मतदारांचा समावेश आहे.  सुमारे चार हजार मतदारांची नावे वेगवेगळ्या यादीमध्ये दुबार असल्याचे निदर्शनास आले आहे.

मतदारयाद्यांचे शुद्धीकरण करण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने राज्यभरात विशेष मोहीम घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने छायाचित्र नसणारे आणि दुबार नावे असणाऱ्या मतदारांची केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (बीएलओ) मतदारांची प्रत्यक्षात भेट घेणार आहेत. मतदारांच्या माहितीबाबत त्रुटी आढळल्यास किंवा त्यांचे छायाचित्र उपलब्ध न झाल्यास अशी नावे मतदारयादीतून वगळण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे.  याच बरोबरीने मतदारयादीत  तांत्रिक चुका दुरुस्त करण्यात येणार आहेत.

छायाचित्र नसणाऱ्या मतदारांना वगळण्याचे काम मध्यंतरी निवडणुका असल्याच्या पार्श्वभूमी वर प्रलंबित राहिले होते. शासनाच्या या मोहिमेत नागरिकांनी तसेच राजकीय पक्षांनी सहकार्य करावे व आपल्या भागातील बीएलओकडे किंवा तहसील कार्यालयात छायाचित्र जमा करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी  केले आहे.

पंचनामे करणार

छायाचित्रे नसलेल्या मतदाराच्या नमूद पत्त्यावर केंद्रस्तरीय मतदान अधिकारी  स्वत: भेट देऊन त्याच्याकडून छायाचित्र घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. मतदार उपलब्ध नसल्यास  पंचनामे करून त्यांचे नाव वगळण्याची प्रक्रिया हाती घेतली जाईल. दुबार नोंदणी  मतदारांची देखील बीएलओ भेट घेऊन कोणत्या मतदारयादीत नाव कायम ठेवावे या बाबत मतदारांचे मत जाणून  घेतील. ज्यांची नावे मतदारयादीतून वगळण्याचे प्रस्तावित असेल त्यांना तालुकास्तरीय सुनावणी देण्यात येणार असून वगळण्यात येणाऱ्या नावांना प्रसिद्धी दिल्यानंतर ही नावे वगळण्यात येतील, असे निवडणूक उपजिल्हाधिकारी संदीप कळंबे यांनी सांगितले.

नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम

मतदारयाद्यांची शुद्धीकरण मोहीम संपल्यानंतर जुलै-ऑगस्ट  तसेच ऑक्टोबर महिन्यात नव्याने मतदार नोंदणी कार्यक्रम हाती घेण्याचे प्रस्तावित आहे. जिल्ह्यतील नव्याने नोंदणी करू इच्छिणाऱ्या नागरिकांना तसेच ज्या मतदारांनी विहित वेळेत छायाचित्र न दिल्याने नावे वगळण्यात आलेल्या नागरिकांना या नवीन मतदार नोंदणी मोहिमेत सहभागी होणे शक्य आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.