वास्तव नाकारुन चालणार नाही, लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंध गरजेचे, सहकार्य करा: शरद पवार

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात यश मिळवायचं असेल तर धैर्याने आणि सामूहिक पद्धतीने या संकटाला सामोरे गेले पाहिजे. त्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. | Sharad Pawar Coronavirus

0

मुंबई: गेल्यावर्षीच्या तुलनेत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत कमालीची वाढ झाली आहे. राज्यात नव्हे तर देशातही इतकी गंभीर आणि भयावह परिस्थिती कधीच नव्हती. हे वास्तव आपल्याला नाकारून चालणार नाही. लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंध लादण्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला कोरोनाच्या संकटाचा सामूहिकरित्या सामना करावा लागेल. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी राज्य सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. (Sharad Pawar on Coronavirus situation in Maharashtra)

शरद पवार यांनी गुरुवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी राज्यातील कोरोनाची आकडेवारी वाचून दाखवत परिस्थिती किती गंभीर आहे, याची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती अतिश्य चिंताजनक आहे. कोरोनाचे हे संकट परतावून लावण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अहोरात्र कष्ट घेत आहे. मात्र, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत.

मात्र, या निर्बंधांमुळे समाजातील कष्टकरी, व्यापारी, शेतकरी आणि इतर समाज घटकांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना नाशिवंत मालाची विक्री कुठे करायची हा प्रश्न पडला आहे. एकूणच यामुळे सर्वांनाच झळ सोसावी लागत आहे. आपण या सगळ्यातून पुढे जात आहोत. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात यश मिळवायचं असेल तर धैर्याने आणि सामूहिक पद्धतीने या संकटाला सामोरे गेले पाहिजे. त्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. कोरोनाचं संकट भीषण आहे. हे वास्तव नाकारून चालणार नाही. आपल्याला एकत्र लढण्याशिवाय पर्याय नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

केंद्र सरकार महाराष्ट्राला सहकार्य करत आहे: शरद पवार

कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. केंद्र सरकारही आपल्याला सहकार्य करत आहे. मी कालच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. राज्यातील आरोग्य सुविधांच्या कमतरतेवर आम्ही चर्चा केली. यावेळी त्यांनी केंद्रीय आरोग्य खाते महाराष्ट्राच्या पाठिशी असल्याचे आश्वासन दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले. महाराष्ट्राचे सामूहिक प्रयत्न आणि केंद्राची मदत या दोहोंच्या साहाय्याने आपण या संकटातून बाहेर पडू, असे शरद पवार यांनी सांगितले.

‘निर्णय राबवण्यासाठी लोकांचे सहकार्य आवश्यक’

कोरोनाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व सूचनांचा विचार करून काही निर्णय घेतले जात आहेत. मात्र, हे निर्णय राबवण्यासाठी लोकांचं सहकार्य आवश्यक आहे. सगळ्यांनी कोरोना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य केले पाहिजे, असेही शरद पवार यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.