Dogecoin | डॉजकॉईन काय आहे? त्याच्या किंमतीत अचानक का वाढ होतेय?

केवळ गंमत म्हणून सुरू करण्यात आलेल्या डॉजकॉईनच्या (Dogecoin) किंमतीत अचानक वाढ झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर ते पुन्हा चर्चेत आलं आहे. नेमकं काय आहे डॉजकॉईन आणि त्याची सुरुवात कशी झाली ते जाणून घेऊया सोप्या भाषेत.

0 8

Dogecoin : बिटकॉईन आणि इथेरम नंतर आता आणखी एक क्रिप्टोकरन्सी चर्चेत आली आहे, त्याचं नाव आहे डॉजकॉईन. अचानक वाढलेल्या किंमतीमुळे, टेस्लाच्या इलॉन मस्कच्या ट्वीटमुळे चर्चेत आलेले डॉजकॉईन काय आहे, त्याची निर्मिती कोणी केली, त्याला ‘जोक टोकन’ का म्हणतात असे एक ना अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. गेल्या एक दोन आठवड्यात या डॉजकॉईनची किंमत अनेक पटींनी वाढली आहे.

गेल्या आठवड्यात, शुक्रवारी याची किंमत 180 टक्क्यांनी वाढली होती. 10 एप्रिलला याची किंमत एक डॉलरच्या तुलनेत 0.6 सेन्ट्स इतकी अल्प होती. आता दोन दिवसापूर्वी त्याची किंमत 34 सेन्ट्स इतकी वाढली. म्हणजे केवळ एकाच आठवड्यात याच्या किंमतीत वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे डॉजकॉईनची एकूण किंमत आता जवळपास 50 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचली आहे.

काय आहे डॉजकॉईन?
बिटकॉईनची सुरुवात झाल्यानंतर त्याची खिल्ली उडवण्यासाठी म्हणून 2013 मध्ये डॉजकॉईनची सुरुवात करण्यात आली होती. म्हणजे डॉजकॉईनची सुरुवात काही गंभीरपणे करण्यात आली नव्हती. आपण इंटरनेटवर ‘डॉज मिम्स’ पाहतो, ज्यामध्ये एका कुत्र्याचा चेहरा असतो, त्या मीम्समचे मूळच डॉजकॉईन आहे.

2013 साली सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या बिली मार्कस आणि जॅकसन पालमेर यांनी बिटकॉईनची खिल्ली उडवण्यासाठी आणि केवळ गंमत म्हणून डॉजकॉईनची सुरुवात केली. याच्या लोगोची कथा गमतीशीर आहे. शिबा इनू ही जपानमधील एका शिकारी कुत्र्याची जात आहे. त्या कुत्र्याचे मीम्स 2013 साली मोठ्या प्रमाणात आले होते. मजेशीर म्हणजे आताही त्या कुत्र्याचे मीम्स धुमाकुळ घालतात. या शिबा इनूच्या मीम्सचा वापर करुन बिली मार्कस आणि जॅकसन पालमेर यांनी डॉजकॉईनचा लोगो तयार केला.

बिटकॉईन आणि डॉजकॉईन मध्ये काय फरक आहे?
बिटकॉईनमध्ये काही ठराविक नंबर्स दिले जातात. म्हणजे जास्तीत जास्त त्यामध्ये तेवढेच कॉईन्स येऊ शकतात. सध्या त्याची संख्या ही 2.1 अब्ज इतकी आहे. बिटकॉईनची वाढणारी किंमत पाहता त्यामध्ये भविष्यात बदल होऊ शकतो. पण डॉजकॉईनच्या बाबतीत तशी कोणतीही मर्यादा नाही. यामध्ये कितीही कॉइन्स बाजारात येऊ शकतात. सध्या 100 अब्जपेक्षाही जास्त कॉईन्स बाजारात आहेत.

2013 साली सुरु करण्यात आलेल्या या डॉजकॉईनला कोणीही गंभीरपणे घेतलं नव्हतं. त्यामुळे डॉजकॉईनकडे लक्ष वेधण्यासाठी याला प्रोत्साहित करणाऱ्या ऑनलाईन कम्युनिटीने काही फंडे वापरायला सुरू केले. 2014 सालच्या हिवाळी ऑलंपिकमध्ये एका खेळाडूला स्पॉन्सर करण्यात आलं. त्याच वर्षी डॉजकॉईन कम्युनिटीने अमेरिकेतल्या टॅक्सी ड्रायव्हर्सना 55 हजार डॉलर्सचे डॉजकॉईन दिले. त्यामुळे डॉजकॉईनकडे अनेकांचे लक्ष गेलं.

आता अचानक चर्चेत का? 
अमेरिकेत जगातले सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी एक्सचेन्ज आहे, त्याचं नाव आहे कॉईनबेस. या एक्सचेन्जमध्ये बिटकॉईन वा इथेरम सारख्या अनेक क्रिप्टोकरन्सींची खरेदी विक्री केली जाते. आता या कॉईनबेस कंपनीची अमेरिकेच्या शेअरमार्केटमध्ये लिस्टिंग करण्यात आली आहे. त्यामुळे अचानक बिटकॉईन आणि इथेरमची किंमत वाढली. बिटकॉईनने सध्या 64 हजार डॉलर तर इथेरमने अडीच हजार डॉलरची किंमत पार केली आहे. याचप्रमाणे डॉजकॉईनच्याही किंमतीत अचानकपणे वाढ झाली आहे.

क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीमध्ये प्रचंड अनियमितपणा आहे. त्याच्या किंमती का वाढत आहेत, त्याचं भविष्य काय आहे हे कुणालाच माहित नाही. डॉजकॉईनचंही असंच आहे. तरीही याच्या मागणीत वाढ होत आहे, याचा व्यापार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

इलॉन मस्कचे गमतीशीर ट्वीट
टेस्लाचा सीईओ इलॉन मस्कने डॉजकॉईनला आपला पाठिंबा दर्शवला आहे. या आधी त्याने बिटकॉईनमध्येही गुंतवणूक केली होती. त्यामुळे बिटकॉईनच्या किंमतीमध्ये अचानक वाढ झाल्यांच पहायला मिळालं होतं. आता डॉजकॉईनच्या बाबतीतही तेच घडलंय.

मस्कने नुसतं डॉजकॉईनच्या बाबतीत केवळ ट्वीटच केलं नाही तर स्वत: च्या बायोमध्ये गंमतीने ‘डॉजकॉईनचा माजी सीईओ’ असा बदलही केला होता. त्यामुळे जगभरातल्या अनेकाचं लक्ष डॉजकॉईनकडे गेलं आणि त्याच्या किंमतीत अचानक वाढ झाली.

गेल्या काही दिवसामागे अमेरिकेतल्या गेमिंग कंपनी गेमस्टॉपच्या किंमती वाढवण्यामागे रेडिट ग्रुपचा जसा हातभार होता तसाच हातभार डॉजकॉईनच्या किंमती वाढवण्यामागे ‘शतोशीस्ट्रीटबेट्स’ या ऑनलाईन ग्रुपचा आहे. शतोशी नाकामोटो यांच्याकडून बिटकॉईनची निर्मीती केली गेली असं मानण्यात येतंय. त्यांच्या नावाने हा ग्रुप सुरू करण्यात आला असून या ग्रुपने डॉजकॉईनच्या किंमती वाढवल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते, डॉजकॉईनच्या किंमतीत होणारी वाढ हा एक बबल गेम आहे, जो कधीही फुटू शकतो. पण डॉजकॉईनचा प्रवास ज्या वेगाने सुरू झालाय ते पाहता ते आता बिटकॉईनला पर्यांय ठरणार का हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.