गव्हातील तेजी फायद्याची; पण खाद्यतेलात कोंडी ; रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम

भारतात युक्रेन आणि रशियातून मोठय़ा प्रमाणावर सूर्यफूल तेल आयात होत असल्यामुळे खाद्यतेलाच्या बाबत कोंडी होणार आहे.

0

पुणे : रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून जागतिक बाजारात गहू आणि मक्याचे दर तेजीत आहेत. त्याचा फायदा देशातील शेतकरी आणि प्रामुख्याने व्यापाऱ्यांना होणार आहे. मात्र, भारतात युक्रेन आणि रशियातून मोठय़ा प्रमाणावर सूर्यफूल तेल आयात होत असल्यामुळे खाद्यतेलाच्या बाबत कोंडी होणार आहे. आयात घटून सूर्यफूल तेलाच्या दरात वाढीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

गव्हाच्या उत्पादनात युक्रेन आणि रशिया हे महत्त्वाचे देश आहेत. २०१७ ते २०२१ या काळात जगाच्या तुलनेत उत्पादनात दोन्ही देशांचा सरासरी वाटा १४ टक्के आणि निर्यातीतील वाटा ३० टक्के राहिला. पण, युद्ध स्थितीमुळे गव्हाचा व्यापार आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे. जगातील प्रमुख देशांनी रशियाच्या आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली आहे, तर युक्रेनमधून होणारी वाहतूक जवळपास ठप्प आहे. परिणामी जागतिक समुदायाकडून भारताकडे गव्हाची मागणी केली जात आहे. सध्या गहू काढणी सुरू झाली आहे. त्यामुळे नव्याने उत्पादन होणाऱ्या गव्हाला चांगली मागणी राहणार आहे, त्याचा फायदा शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होणार आहे.

या देशांना गव्हाची निर्यात

बांगलादेश, आखाती देश, दक्षिण कोरिया, लेबनान, श्रीलंका, फिलिपिन्स या देशांना गव्हाची निर्यात होते. भारताने २०२१मध्ये ६१.२ लाख टन निर्यात केली होती. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत ४० लाख टन निर्यात होण्याची शक्यता आहे. भारताच्या गव्हाला दरवाढीसह हक्काची बाजारपेठ मिळणार आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा फटका खाद्यतेलाच्या रूपाने देशाला बसणार आहे. जगाच्या तुलनेत या दोन्ही देशात सूर्यफुलाचे ६० टक्के उत्पादन होते. जागतिक सूर्यफूल तेलाच्या निर्यातीत या देशांचा वाटा ७५ टक्के इतका आहे. या दोन्ही देशांचा सूर्यफूल तेलाच्या जागतिक व्यापारात मोठा दबदबा आहे. भारताला खाद्यतेलाच्या एकूण गरजेच्या ६० टक्के तेल आयात करावे लागते. एकूण आयातीत सूर्यफूल तेलाचा वाटा १४ टक्के आहे. सूर्यफूल तेलाच्या एकूण आयातीपैकी सुमारे ९३ टक्के आयात या दोन देशांतून होते. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात दरवर्षी २५ लाख टन सूर्यफूल तेलाचा वापर होतो, त्यापैकी देशात फक्त ५० हजार टन सूर्यफूल तेलाचे उत्पादन होते. बाकी तेल आयात करावे लागते. २०१९मध्ये सूर्यफूल तेलाचे दर ९८ प्रति लिटर होते, त्यात वाढ होऊन २०२२च्या फेब्रुवारीत १६१ रुपये लिटर इतके झाले आहेत. युद्धाची परिस्थिती पाहता आयात घटून सूर्यफूल तेलाच्या दरात वाढीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.