सावधान! पुण्यात कोरोनावरील बनावट औषधांची होलसेल विक्री; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

0 11

Crime in Pune: कोरोना विषाणूच्या (Corona virus) उपचारांत वापरल्या जाणाऱ्या औषधांचं नाव वापरून बनावट औषध (Counterfeit medicine) विक्री केल्याप्रकरणी सदाशिव पेठेतील एका औषध वितरकास अटक करण्यात आली आहे.

पुणे : कोरोना विषाणूच्या (Corona virus) उपचारांत वापरल्या जाणाऱ्या औषधांचं नाव वापरून बनावट औषध (Counterfeit medicine) विक्री केल्याप्रकरणी सदाशिव पेठेतील एका औषध वितरकास अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपी कोरोना विषाणूच्या उपचारातील महत्त्वाच्या औषधांची नावं वापरून बनावट औषधांची विक्री करत होता. याप्रकरणी अन्न व औषध विभागानं मोठी कारवाई केली आहे. त्याचबरोबर कंपनीच्या संचालकाविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.

प्रभाकर नामदेव पाटील असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून ते उमेद फार्मा सेल्स कंपनीचे भागीदार आहेत. यासोबतचं मॅक्सरिलीफ हेल्थकेअर या औषध कंपनीचे संचालक सुदीप मुखर्जी याच्या विरोधातही  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॅक्सरिलीफ हेल्थकेअर ही कंपनी हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील अंजी येथील असून या कंपनीत बनावट औषधे तयार केल्याचं निष्पन्न झालं आहे. शिवाय या कंपनीकडे औषधे निर्मिती करण्याचा कसलाही परवाना नाही.

संबंधित कंपनीत कोरोना विषाणूच्या संसर्गावर महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या फॅविपिराविर आणि हायड्रॉक्सिक्लोरोक्विन या औषधांचं नाव वापरून बनावट औषध निर्मिती केली जात होती. अलीकडेच पोलिसांनी मुंबईतून 1 कोटी 54 लाख रुपयांची बनावट औषधे जप्त केली आहेत. त्याचबरोबर सुदीपकुमार मुखर्जी यालाही अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या अन्न आणि औषध प्रशासनानं मॅक्सरिलीफ हेल्थकेअर कंपनीबाबत हिमाचल प्रदेशात विचारणा केली असता, संबंधित कंपनीकडे औषध निर्मिती करण्याचा परवाना नसल्याचं समोर आलं आहे. ही कंपनी विना परवाना पाच वेगवेगळ्या औषधांची निर्मिती करत असल्याचं तपासात उघड झालं आहे.

देशातील अनेक शहरात या औषधाचं वितरण झाल्याची संशय पोलिसांना आहे. असाच प्रकार पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात सुरू असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली. ही औषधं सदाशिव पेठेतील उमेद फार्मा सेल्सच्या मदतीनं पुणे शहर आणि जिल्ह्यात विक्रीस पाठवण्यात आल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून विश्रामबाग पोलीस याचा तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.