विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा : भारतीय महिलांना सुवर्णपदक

दीपिकाचे हे विश्वचषक स्पर्धेतील पाचवे सांघिक सुवर्णपदक ठरले.

0 4

भारतीय महिलांच्या रिकव्र्ह संघाने रोमहर्षक लढतीत मेक्सिकोचा ५-४ असा पाडाव करत विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले. अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कोमालिका बारी यांच्या भारतीय संघाने शूट-ऑफमध्ये ४-४ अशी कामगिरी केली होती. मात्र या तिघींनी अखेरच्या क्षणी भारताला २७-२६ असे गुण मिळवून देत सुवर्णपदक मिळवून दिले. विश्वचषक स्पर्धेत भारताने तब्बल सात वर्षांनंतर पहिले सांघिक सुवर्णपदक मिळवले. दीपिकाचे हे विश्वचषक स्पर्धेतील पाचवे सांघिक सुवर्णपदक ठरले.

दीपिकाने शूट-ऑफ फेरीत १० गुण मिळवत २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या आयडा रोमन हिच्यावर दबाव आणला. अखेर आयडाला नऊ गुणांची आवश्यकता असताना फक्त आठ गुण मिळवता आले.

भारताचे हे रिकव्र्ह प्रकारातील पाचवे सुवर्णपदक ठरले. याआधी भारताने शांघाय (२०११), मेडेलिन (२०१३), क्रोक्लॉ (२०१३, २०१४) सुवर्णपदक पटकावले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.