यवतमाळ : गर्भवती वाघिणीची शिकार; आठ जणांना अटक

0 2

पांढरकवडा वनविभागांतर्गत येणाऱ्या मांगुर्ला वनक्षेत्रातील गर्भवती वाघिणीच्या शिकारीत पाच तर मारेगाव वनक्षेत्रातील वाघिणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात तीन अशा दहा जणांना शनिवारी वन आणि पोलिसांच्या पथकाने अटक केली. आरोपींना २१ जूनपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

मांगुर्ला वनक्षेत्रातील एका नाल्याजवळील गुहेत दोन महिन्यांची गर्भवती वाघीण मृतावस्थेत आढळून आली होती. तिची निर्घृण हत्या करून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्लेखोरांनी तिच्या पायाचे दोन पंजे कापून नेले होते. वनविभाग व पोलिसांच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन झरी तालुक्यातील दुभाटी येथून अशोक व लेतू आत्राम या बापलेकांना अटक करून त्यांच्या घरातून वाघिणीचा पंजा आणि नख जप्त केला. त्यानंतर वनविभाग व पोलिसांनी संयुक्तपणे आरोपींचा शोध सुरू केला. यवतमाळ जिल्ह्यातील दोन्ही वाघिणीच्या शिकारीतील आरोपी झरी तालुक्यातील वरपोडला असल्याची माहिती मिळाली. या आधारावर धाड टाकून अटक कारवाई करण्यात आली.

मांगुर्ला वनक्षेत्रातील वाघिणीच्या शिकारीत नागोराव भास्कर टेकाम, सोनू भवानी टेकाम, गोली रामा टेकाम, बोनू तुकाराम टेकाम, तुकाराम भवानी टेकाम सर्व रा. वरपोड यांना तर मारेगाव वनक्षेत्रातील वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी दौलत भीमा मडावी, मोतीराम आत्राम, प्रभाकर महादेव मडावी रा. येसापूर (झरी) यांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरातून वन्यप्राण्यांचे मांस आणि शिकारीचे साहित्य आढळले. आरोपीना अटक करण्याची कारवाई पांढरकवडा वनविभागाचे उपवनसंरक्षक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.